कोविड पॉझिटिव्‍ह महिला रूग्‍णाने दिला एका निरोगी मुलीला जन्‍म 

कोविड पॉझिटिव्‍ह महिला रूग्‍णाने दिला एका निरोगी मुलीला जन्‍म 



नवी मुंबई


 नुकतेच वाशी येथील फोर्टिस सहयोगी हॉस्पिटल हिरानंदानी हॉस्पिटलमध्‍ये भरती करण्‍यात आलेल्‍या ३५ वर्षीय कोविड-१९ पॉझिटिव्‍ह महिला रूग्‍णाने ८ मे रोजी हॉस्पिटल्‍या सी-सेक्‍शनमध्‍ये एका निरोगी तान्‍ह्या मुलीला जन्‍म दिला. हॉस्पिटलमधील आयसोलेशन कक्षामध्‍ये तिच्‍यावर उपचार करण्‍यात आले आणि काल तिला घरी जाण्‍यासाठी डिस्‍चार्ज देण्‍यात आला. महिलेला तिच्‍या प्रसूतीकाळाच्‍या ३६व्‍या आठवड्यामध्‍ये संसर्गाची लागण झाली होती. अगदी सावधपणे तिचा उपचार व प्रसूतीचे नियोजन करण्‍यात आले. हॉस्पिटलमध्‍ये भरती केल्‍यानंतर हॉस्पिटलमधील कोविड टास्‍कफोर्स म्‍हणून असलेल्‍या मल्‍टी-डिसीप्‍लीनरी टीमने तिच्‍या केसची काळजीपूर्वक तपासणी केली. रूग्‍णावर प्रोटोकॉल-नुसार कोविड-१९ संदर्भात उपचार करण्‍यात आला आणि तिच्‍या मुख्‍य अवयवांच्‍या कार्यांवर बारकाईने दिवसरात्र लक्ष ठेवण्‍यात आले. 


कोविड-१९ची लागण झालेल्‍या रूग्‍णावर करण्‍यात आलेल्‍या उपचार प्रक्रियेबाबत बोलताना हॉस्पिटलमधील इंटर्नल मेडिसीन विभागाच्‍या डॉ. फराह इंगळे म्‍हणाल्‍या, ''कोविड-१९ पॉझिटिव्‍ह रिपोर्टसह रूग्‍णाला हॉस्पिटलमध्‍ये भरती करण्‍यात आले. आरोग्‍य मंत्रालयाच्‍या मार्गदर्शकतत्त्वांनुसार तिच्‍यावर उपचार करण्‍यात आले आणि तिने देखील उपचारांना चांगला प्रतिसाद दिला.'' रूग्‍णाची प्रसूती महत्त्वाची असल्‍यामुळे टीमने स्‍त्रीरोग व प्रसूतीशास्‍त्र विभागाच्‍या डॉ. मंजिरी मेहता आणि बालरोग विभागचे डॉ. कुमार साळवी यांचा सल्‍ला घेतला.