कोरोना महामारीत जीव मुठीत धरून काम करणारे सर्व कंत्राटी कामगार व कायम कामगारांना ५० लाख रुपयेचा बिमा लागू करा
कल्याण
कोरोना महामारीत सर्वच महापालिका कामगार, कर्मचारी- अधिकारी आपले जीव धोक्यात घालून काम करत आहेत. केंद्र सरकारने ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना ५० लाखांचा विमा लागू करण्याची घोषणा केली आहे. याची माहिती आपल्याला आहेच. तरी आमच्या खालील मागण्यांचा सहानुभूतीने विचार करून उचित निर्णय घ्यावा अशा मागणीचे पत्र श्रमिक जनता संघाच्या वतीने कल्याण डोंबिवली महानगर पालिका आयुक्तांना पाठवण्यात आले आहे.
केंद्र सरकार, महाराष्ट्र राज्य सरकार यांनी जाहीर केल्या नुसार कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डॉक्टर, नर्सेस, पेरामेडिकल स्टाफ सहित शहरातील साफसफाई करणारे घनकचरा, मलनिस्सारण, पाणी पुरवठा व अत्यावश्यक सेवा म्हणून राबणारे कायम आणि कंत्राटी पध्दतीने कार्यरत सर्व कामगारांना रुपये ५० लाखाचे विमा लागू करा.
मुंबई महापालिका सह विविध महापालिका, नगरपालिका प्रशासन यांनी त्यांच्या कडील सर्व कार्यरत कायमस्वरूपी व कंत्राटी कामगारांची यादी तयार करून सर्वांना बिमा व अन्य सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. आपण देखील सदर बाबतीत तातडीने निर्णय घ्यावा. अशी मागणी श्रमिक जनता संघ या पत्राद्वारे करीत आहे.
'ह' प्रभागातील घंटागाडी, डम्पर, प्लेसर व आर सी गाड्या वरील सुमारे शंभर कर्मचारी ( सफाई कामगार व वाहन चालक) यांना औद्योगिक न्यायालयाने महपालिकेच्या कायम सेवेत सामावून घेण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र महापालिका प्रशासन या कामगारांना शासनाने लागू केलेले किमान वेतन देखील अदा न करून अन्याय करीत आहे. फक्त सात - आठ हजार रुपये महिना वेतनावर राबणारे हे कर्मचारी करोना महामारी मध्ये देखील जीव मुठीत धरून काम करत आहेत. या कामगारांना कोरोना आजाराची लागण झाल्यास हे उपचार त्यांच्या आर्थिक कुवतीच्या बाहेर असेल. त्यामुळे कोणात्याही कामगारांना घाणीत करत असल्याने कोरोना आजाराची लागण झाल्यास त्यांच्या उपचाराची पूर्ण जबाबदारी महापालिका प्रशासनाने उचलावी. घंटागाडी, डम्पर, प्लेसर, आर सी अथवा रस्ते सफाई करणारे सफाई कामगार व वाहनचालक आदी कंत्राटी कामगार यांना देखील प्रमाणित दर्जाचे मास्क आणि हैंडग्लोव्ज आदी सुरक्षा साहित्य नियमितपणे वेळोवेळी पुरविण्यात यावे. असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.