कोरोनाच्या संकटाने केली फिरते व्यापारी, दुकानदार, छोटे उपाहारगृह यांची आर्थिक कोंडी
ठाणे
करोनाच्या संकटात ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या आठवडी बाजारांना सर्वाधिक फटका बसला आहे. ठाणे जिल्ह्य़ातील कल्याण, भिवंडी, मुरबाड, शहापूर, अंबरनाथ, तर पालघर जिल्ह्य़ातील वाडा, मोखाडा या तालुक्यांतील महत्त्वाचे बाजार बंद असल्याने फिरते व्यापारी, दुकानदार, छोटे उपाहारगृह यांची आर्थिक विवंचना होत आहे. आर्थिक चक्र थांबल्याने भविष्याचे नियोजन करायचे कसे, असा सवाल छोटय़ा व्यापाऱ्यांसमोर आहे. पावसाळय़ापूर्वी करायच्या दुरुस्ती, शेती अवजारे, अन्न-धान्य खरेदी बंद पडल्याने ग्रामीण भागातील शेतकरी, आदिवासींनाही पुढचे चार महिने कसे काढायचे, असा प्रश्न पडला आहे.
आठवडी बाजारांच्या निमित्ताने तालुक्यातील फिरते व्यापारी, शेतकरी, दुकानदार आणि विक्रेते यांचा व्यवसाय होतो. या बाजारांमध्ये भाजीपाला, फळे यांच्यासह कडधान्य, कपडे, सुकी मासळी, गावठी कोंबडी, बाबूंच्या टोपल्या, लाकडय़ाच्या वस्तू, शेती अवजारे आणि हंगामी वस्तूंची मोठय़ा प्रमाणावर विक्री होत होती. पावसाळ्यापूर्वी करायच्या शेतीच्या कामासाठी आवश्यक लोखंडी, लाकडी अवजारे, नाल, पागा, नांगर दुरुस्ती अशी कामे करण्यासाठी हे आठवडी बाजार महत्त्वाचे ठरत होते. पावसाळ्यापूर्वी घरदुरुस्ती, छप्पर दुरुस्तीच्या कामांसाठीची आवश्यक साधनसामग्री मिळण्यासाठीही आठवडी बाजारांवर अवलंबून राहावे लागत होते. अनेक बाजारांत गाई, म्हशी, बैल आणि बकऱ्यांची खरेदी-विक्रीही होत होती. आठवडी बाजार बंद पडल्याने या खरेदी-विक्रीला मोठा फटका बसला आहे.