लॉक डाऊनच्या काळात अशीही मंडळी आहेत की ज्यांना कोरोना संकटावर मात करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या परिस्थितीत घरी किमान दोन वेळेचं अन्न शिजवण्याकरिता देखील आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, अनेकांचे घरगुती बजेट कोलमडल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अशक्य झाले आहे. अशा प्रकारे आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असलेल्या नागरिक बंधू भगिनींना माणुसकीचा हात देण्यासाठी अन्नधान्य शिधा वस्तू तांदूळ,डाळ,तेल,साखर,पीठ आदी मोफत पुरवठा करण्यात येत आहे. ठाण्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी लॉक डाऊन च्या काळात कुणीही उपाशी राहू नये याकरिता लॉक डाऊन च्या अगोदर दोन दिवसांपासून किसन नगर येथे भटारखाना सुरु केला असून कोपरी येथील शिवमंदिरात धान्याची पॅकिंग करून गोरगरिबांना धान्य पोहचविण्याची जबाबदारी अविरत सुरु ठेवली आहे.
अत्यंत शिस्तबद्ध आणि सुनियोजित पद्धतीने अन्नधान्याची पाकीटं बनविण्याचे काम सुरु आहे.  पोलीस स्टेशन,वाहतूक पोलीस,टी एम टी,एस टी व बेस्ट कर्मचारी,रुग्णाच्या मोफत वाहतुकीसाठी सज्ज असलेल्या अबोली रिक्षा चालक भगिनी तसेच ठाण्यातील सुरक्षा रक्षकाचे काम करणारे कामगार, सिव्हिल रुग्णालय,छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा तसेच झोपडपट्टी परिसरातील मोलमजुरी करणारे हातावर पोट असणाऱ्यांसाठी रोज सकाळ संध्याकाळ जेवण तयार करण्यासाठी भटारखाना सज्ज आहे. याठिकाणी पुलाव भात,खिचडी व डाळ-खिचडी रोज आलटून पालटून बनविण्यात येत आहे. ठामपा परिसरातील अनेक नगरसेवक,पदाधिकारी,शिवसैनिक यांच्या हस्ते हे जेवण पोहचविणायचे काम होत आहे. संपूर्ण लॉक डाऊन संपेपर्यंत हे काम अविरत चालू असणार असून स्थायी समिती सभापती राम रेपाळे,विभागप्रमुख बबन मोरे परिवहन सदस्य प्रकाश कोटवानी तसेच नगरसेवक प्रकाश शिंदे आदी या कामासाठी तत्पर रहात आहेत.
 
 
 
