३ मे पर्यंत ठाण्यातील किसननगर भटवाडी, गणेशचौक, शिवटेकडी परिसर संपूर्णतः बंद
ठाणे
ठाण्यातील वागळे प्रभाग समितीच्या हद्दीत लॉकडाउन आणि संचारबंदीनंतरही नागरिक रस्त्यावर, दुकानांमध्ये, भाजीपाला घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. लॉकडाउन करूनही काहीही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे करोना संक्रमणाचा धोका वाढू लागला असून १५ ते २३ एप्रिल या कालावधीत वागळे प्रभाग समितीच्या कार्यक्षेत्रात १९ रुग्ण आढळून आले. गर्दी टाळण्यासाठी पोलिस आणि पालिका प्रशासनाकडून आवश्यक प्रयत्नही करण्यात येत आहेत. तरीही नागरिकांचे रस्त्यावर फिरणे बंद झाले नाही. ज्या परिसरात करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, तो भाग सील केला आहे. तरीही रस्त्यावरील नागरिकांची संख्या जैसे थे आहे. अखेर पालिका प्रशासनाने रविवार मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते ३ मे रात्री १२ वाजेपर्यंत किसननगर भटवाडी, गणेशचौक, शिवटेकडी, किसननगर २, ३, रोड नंबर १६, रोड नंबर २२ या परिसरात नागरिकांच्या वावर संपूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सर्व परिस्थितीबाबत २२ एप्रिल रोजी पोलिस अधिकारी आणि पालिका अधिकारी यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत भटवाडीसह गणेश चौक, शिवटेकडी, किसननगर नंबर ३ हा परिसर संपूर्ण बंद न करता सकाळी ७ ते १० या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने चालू ठेवण्याविषयी ठरले होते. दहा वाजल्यानंतर दुकान उघडलेले आढळल्यास दुकान सील करण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपाययोजनेनंतरही करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक आणि नगरसेवकांकडून हा परिसर पूर्णपणे बंद करण्याची मागणी होऊ लागली होती. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील या परिसरातील करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे आदेश दिले.