आमदार घेताहेत हॉस्पीटलचे महिन्याला दहा लाख भाडे

 आमदार घेताहेत हॉस्पीटलचे महिन्याला दहा लाख भाडे



कल्याण


करोनाबाधित रुग्णांसाठी डोंबिवलीमधील आपलं रुग्णालय मनसे आमदार राजू पाटील यांनी महापालिकेला सोपवलं आहे.  यासाठी कोणतंही भाडं आकारत नसून महापालिकेला मोफत सुविधा देत असल्याचं सांगितलं होतं. मात्र या हॉस्टिपलसाठी महापालिका राजू पाटील यांना महिन्याला १० लाखांचं भाडं देत आहे. इतकंच नाही तर महापालिका रुग्णालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांचं वेतनही देणार आहे. रुग्णालय आणि महापालिकेत झालेल्या सामंजस्य करारानुसार (MoU) महापालिकेने ही सुविधा BAJ Symbiotic Pvt Ltd. कडून भाडेतत्वावर घेतली आहे. जोपर्यंत करोनावर नियंत्रण मिळवलं जात नाही तोपर्यंत हा करार वैध असणार असल्याचं वृत्त मुंबई मिररने दिले आहे.


“कल्याण डोंबिवलीत त्यातही खासकरुन डोंबिवली पूर्व य़ेथे करोनाचे रुग्ण सापडू लागल्यानंतर महापालिकेने रुग्णांवर उपचार करण्यासाठी वेगवेगळ्या रुग्णालयांची पाहणी करण्यास सुरुवात केली होती,” अशी माहिती राजू पाटील यांनी मिररला एप्रिल महिन्यात दिली होती. “रुग्णांना वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यापेक्षा त्यांना एक समर्पित सुविधा दिली पाहिजे असा सल्ला मी महापालिका आयुक्तांना दिला होता. यावेळी मी त्यांना माझं रुग्णालय मोफत वापरण्याची ऑफर दिली,” असंही राजू पाटील यांनी सांगितलं होतं.  रुग्णालयात १०० बेड असले तरी सोशल डिस्टन्सिंग पाळायचं असल्याने ६५ रुग्णांवरच उपचार केले जाऊ शकतात. आयसीयूमध्ये १५ बेडची सुविधा आहे. तसंच तीन व्हेंटिलेटर आहेत. महापालिका तात्पुरते काही व्हेंटिलेटर बसवत आहे. कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी महापालिका राजू पाटील यांना महिन्याला १० लाखांचं भाडं देत होतं अशी कबुली दिली आहे. मात्र त्यांनी सविस्तर माहिती देण्यास नकार दिला.