फिरते भाजी विक्रेत्यांना भाजी विक्री करण्यास परवानगी देण्याची मागणी

 फिरते भाजी विक्रेत्यांना भाजी विक्री करण्यास परवानगी देण्याची मागणी



कल्याण


    महानगरपालिका क्षेत्रात कोरोना साथीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी   डॉ.विजय सूर्यवंशी यांचे दालनात महापालिका पदाधिकारी/गटनेते यांचे समवेत अनेक बाबींवर चर्चा झाली, यामध्ये महापालिका क्षेत्रातील दुकाने सकाळी 5.00 ते सायंकाळी 5.00 या कालावधीत सुरु ठेवण्या ऐवजी सकाळी 9.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत चालू ठेवावीत हा मुद्दा मांडण्यात आला. त्याचप्रमाणे सद्यस्थितीत नागरीकांना मदत करणेसाठी प्रत्येक निवडणूक प्रभागात नगरसेवक/महापालिका अधिकारी/कर्मचारी यांची एक संयुक्त समिती असावी याबाबींवरही चर्चा करण्यात आली.


महानगरपालिकेने भाजी पाला विक्रीसाठी जागा/मैदाने नेमून दिली असली तरीही सदर ठिकाणी  तसेच किरकोळ भाजी- पाला विक्रेत्यांचे दुकानासमोर मोठया प्रमाणात गर्दी जमत असल्याचे दिसून आल्यामुळे, एकाच ठिकाणी भाजी विक्रेत्यांना बसायची परवानगी न देता, त्या ऐवजी हातगाडीवर  फिरते भाजी विक्रेत्यांना भाजी विक्री करण्यास परवानगी दयावी म्हणजे भाजी खरेदीची गर्दी कमी करणे शक्य होईल हा मुद्दा देखील घेण्यात आला.


तसेच सद्याच्या आपत्कालीन परिस्थितीत काम करणाऱ्या महापालिका अधिकारी/कर्मचाऱ्यांचा विमा काढावा, प्रत्येक नगरसेवकांच्या वॉर्डात नगरसेवकांनी नेमून दिलेला स्वयंसेवक/समन्वयक नेमण्यात यावा. याबाबतीतही उहापोह करण्यात आला. तसेच महापालिका अंदाजपत्रकातील विशिष्ट निधी आपत्कालीन व्यवस्थेसाठी ठेवण्यात यावा अशीही चर्चा सदर बैठकीत करण्यात आली. त्याप्रमाणे प्रत्येक निवडणूक प्रभागात फवारणीसाठी स्वतंत्र हॅन्डपंप उपलब्ध करुन देणे या विषयाला मान्यता देण्यात आली.


  सदर बैठकीस विकास म्हात्रे सभापती स्थायी समिती, प्रकाश पेणकर सभागृह नेता, राहुल दामले विरोधी पक्षनेता,दशरथ घाडीगांवकर गटनेता शिवसेना, मंदार हळबे गटनेता मनसे, दर्शना शेलार, गटनेता कॉग्रेस आय्, संतोष तरे गटनेता राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष इ.मान्यवर उपस्थित होते.