४८ वर्षीय डॉक्टरला कोरोनाची बाधा

४८ वर्षीय डॉक्टरला कोरोनाची बाधा



 ठाणे


ठाण्यातील लुईसवाडी येथे दवाखाना असलेल्या ४८ वर्षीय डॉक्टरला कोरोनाची बाधा झाल्याचा प्रकार गुरुवारी समोर आला आहे. तर, कळव्यातील एक व्यक्तीही कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या १३वर पोहोचली आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यास ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सुरुवात केली आहे.


या व्यक्तींच्या कुटुंबीयांचे घरच्या घरी विलगीकरण केले असून बाधित डॉक्टरवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लुईसवाडी परिसरातील दवाखान्यामधील कोरोनाबाधित डॉक्टरला ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, त्याची पत्नी आणि मुलाचे घरच्या घरी विलगीकरण केले आहे. हा डॉक्टर गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्याचा दवाखाना बंद होता.


बुधवारी रात्री त्याला सिव्हिल रुग्णालयाच्या विलगीकरण वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. या डॉक्टरकडे येणाऱ्या रुग्णाकडून कोरोना विषाणूचे संक्रमण झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या  व्यक्तींचा तसेच त्याच्या पत्नी व मुलाच्या संपर्कातील व्यक्तींचीही शोध सुरू केला आहे. तर, कळव्यातील एक ५९ वर्षीय व्यक्ती खासगी कंपनीत कार्यरत असून त्यालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.