भिवंडी लोकसभा मतदारसंघात मदतकार्य
शहापूर
खासदार कपिल पाटील फाऊंडेशनच्या वतीने `कोरोना'मुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सुमारे २५ हजार कुटुंबांना कांदा-बटाट्यासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. भिवंडी शहराबरोबरच कल्याण शहर, मुरबाड, शहापूर, भिवंडी आणि कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागातही मदत पोचविण्यात आली. भिवंडी लोकसभा मतदारसंघात कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर या आपत्तीच्या काळात नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर असल्याचे स्पष्ट केले होते. घरात राहूनच कार्यकर्त्यांच्या मदतीने खासदार कपिल पाटील यांनी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व फाऊंडेशनच्या मदतीने ३० टन कांदा-बटाटा वाटप केले. कांदा-बटाट्याबरोबरच तांदूळ, पामतेल, आटा, साखर, चहापावडर, हळद, मसाला आदी साहित्यही पुरविण्यात आले. भिवंडी शहराबरोबरच भिवंडी ग्रामीण, कल्याण शहर, शहापूर, मुरबाड तालुक्याबरोबरच बदलापूरच्या ग्रामीण परिसरात जीवनावश्यक वस्तू पुरविण्यात आल्या.