चितळसर पोलिसांची अनोखी शक्कल, मॉर्निंगवॉक करणाऱ्यांची आरती
ठाणे :
नागरिकांनी घराबाहेर पडू नये, सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊन करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने टाळेबंदी लागू केली आहे. यामुळे नागरिकांच्या बाजारहाटावरही निर्बंध आले असताना प्रभातफेरीचा दंडक सोडण्यास अनेक नागरिक तयार नाहीत. अखेर यावर उपाय म्हणून चितळसर पोलिसांनी सोमवारपासून आरती ओवळण्यास सुरुवात केली आहे. जे नियम मोडतात त्यांच्यावर पोलिसांनी विडंबनात्मक आरती तयार केली आहे. ‘आम्ही स्वत:ला सुशिक्षित, मोठय़ा संकुलातील रहिवासी समजतो.. पण आमच्यामध्ये अजून अक्कल आलेली नाही.. आम्ही करोना पसरविण्यास जबाबदार आहोत..’ अशा आशयाची ही आरती भररस्त्यात जोरात म्हणण्यात येते.
करोनाचा प्रसार रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली असतानाही मॉर्निग वॉक अर्थात प्रभातफेरीसाठी नित्यनेमाने बाहेर पडणाऱ्यांना चितळसर पोलिसांनी अद्दल घडवण्यास सुरुवात केली आहे. ठाण्यातील वसंत विहार, हिरानंदानी मेडोज, हाइड पार्क, मानपाडा या भागांतून प्रभातफेरीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची भररस्त्यात पोलिसांकडून आरती ओवाळण्यात येत आहे. या विडंबनात्मक आरतीमुळे किमान लाजेकाजेस्तव तरी हे नागरिक घराबाहेर पडणे बंद करतील, अशी आशा पोलिसांनी व्यक्त केली आहे.