संकटाला रडून नाही तर लढून परतवण्याचा कृषी विभागाचा संकल्प
बदलापूर
कोरोना महामारीचे संकट उभे राहिल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. गेल्यावर्षी ठाणे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भातपिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे यंदाच्या वर्षात ही तूट भरून काढण्यासाठी कोरोनाच्या संकटातही कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे. त्यामुळे यंदा बळीराजा भाताबरोबरच कडधान्य आणि भाजीचे पीक घेण्यासाठी तयारीला लागला आहे. आलेल्या संकटाला रडून नाही तर लढून परतवण्यावर भर देण्याचा संकल्प बळीराजाबरोबरच कृषी विभागाने केला आहे..
आमदार किसन कथोरे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी अधिकाऱ्यांची याबाबत बैठक झाली. यात या विषयवार चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. भातशेतीच्या बांधावर तुरीचे पीक घेण्यासाठी कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे. अंबरनाथ, कल्याण आणि मुरबाड तालुक्यातील बहुतेक शेतकरी हे कृतीशील व नवनवीन प्रयोग करणारे आहेत. त्यांना राज्याच्या कृषी विभागाचेही पाठबळ मिळत आहे
शेताच्या बांधावर गवत मोठया प्रमाणात उगवते. या गवतामुळे फायदा होत नाही तर उलट नुकसानच होते. या गवताच्या जागी जर तुरीबरोबरच लाल डांगराचा लागवडीचा प्रयत्न केला तर भाताबरोबर कडधान्य आणि भाजी असे पीक घेता येईल. यंदा पहिल्यांदाच कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यात हा प्रयोग करण्याचा विचार कृषी विभागाने केला आहे.
शेताच्या बाजूला अनेक ठिकाणी ओसाड पडीक जमीन उपलब्ध आहे. अशा ओसाड जमिनीवर बांबू लागवडीसाठीही चाचपणी सुरू असून त्यासाठी काही भागांची नावे पुढे आली आहेत. अंबरनाथ तालुक्यात कारंद, येवे, बोराडपाडा अशा भागांत बांबू लागवडीसाठी पोषक जमीन असल्याची माहिती अंबरनाथ पंचायत समितीचे कृषी अधिकारी आर.एच.पाटील यांनी दिली. कृषी विभागाच्या सकारात्मक प्रयत्नांमुळे अंबरनाथ, कल्याण व मुरबाड तालुक्यांत भाताबरोबरच तूरडाळ, लाल डांगर, बांबू अशा पिकांमुळे शेतकन्यांना अतिरिक्त उत्पन्न देण्याचा प्रयत्न सुरू आहे.