12 पेक्षा जास्त दिवस उलटूनही PPE किट्स, एन-95 मास्क आणि व्हेन्टिलेटर्सची महाराष्ट्राला मदत नाही
मुंबई
महाराष्ट्र कोरोना व्हायसरशी लढताना वैद्यकीय साधनसामुग्रीचा तुटवडा भासत असल्याचं राज्य सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळेच राज्य सरकारनं आता खासगी उत्पादकांना ऑर्डर देणं सुरू केलं आहे. 2 एप्रिलला केंद्र सरकारने पत्र लिहून सर्व राज्यांना PPE किट्स, एन-95 मास्क आणि व्हेन्टिलेटर्स विकत घेण्यावर निर्बंध घातले. PPE किट्स, एन-95 मास्क आणि व्हेन्टिलेटरचा पुरवठा केंद्र सरकारकडून केला जाईल, अशी सूचना त्यात करण्यात आली होती.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या माहितीनुसार, “PPE आणि मास्कची गुणवत्ता योग्य असणं आवश्यक आहे. गुणवत्ता चांगली नसेल तर, डॉक्टर-नर्स यांना संसर्ग होऊ शकतो. त्यामुळेच केंद्राने राज्यांवर या वस्तू खरेदी करण्यावर निर्बंध घातले आहेत.” पण याला आत 12 पेक्षा जास्त दिवस उलटून गेलेत. परिणामी महाराष्ट्राला अजूनही मदत न मिळाल्याने, राज्य सरकारने या वस्तूंची खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
राज्यात उत्पादन होणाऱ्या PPE किट्सची गुणवत्ता तपासण्यासाठी राज्य सरकारने आधी हाफकिन संस्थेची निवड केली होती. सर्व पुरवठादारांना त्यांचं उत्पादन हाफकिनकडून प्रमाणीत करून घेणं बंधनकारक करण्यात आलं होतं. मात्र, शुक्रवारी सरकारने हा निर्णय रद्द करण्याचं परिपत्रक काढलं. वैद्यकीय शिक्षण विभागानं आता त्यासाठी नवी मानकं ठरवून आदेश जारी केले आहेत. त्यानुसार आता जिल्हास्तरावर या वस्तूंची खरेदी करता येणार आहे.
याबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख म्हणाले, “केंद्र सरकारने PPE किट्स खरेदी सुरू केलीये. त्यांच्याकडून या वस्तू मिळणार आहेत. पण आता जिल्हा स्तरावर खरेदीचे अधिकार देण्यात आले असून, पुरवठादारांसोबत दर करार केले जात आहेत.” दुसरीकडे याबाबत बीबीसीशी बोलताना राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे अतिरिक्त संचालक, डॉ. तात्याराव लहान म्हणाले, “राज्य सरकारने PPE किट्ससाठी 5 आणि एन-95 मास्कसाठी 4 पुरवठादारांसोबत करार केला आहे. तसंच येत्या काही दिवसांत आम्हाला केंद्राकडूनही या गोष्टी मिळण्याची अपेक्षा आहे.” दरम्यान PPE किट्स आणि एन-95 मास्कचं उत्पादन करणाऱ्या व्यापाऱ्यांनी फक्त महाराष्ट्रासाठीच उत्पादन करावं, यासंबंधीचे निर्बंध राज्य सरकार घालणार असल्याची माहिती, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.