६५ कोटी रूपयांच्या जादा उत्पन्नासाठी २५ लाख ठाणेकर वेठीला
ठाणे
महापालिकेनं अर्थसंकल्पात पाणी पुरवठ्याच्या दरात ५० टक्के वाढ सुचवली आहे. झोपडपट्टी वासियांकडून १३० ऐवजी २०० तर सदनिका धारकांकडून ३१५ ते ३४५ रूपये आकारले जाणार आहेत. केवळ ६५ कोटी रूपयांच्या जादा उत्पन्नासाठी महापालिकेकडून २५ लाख ठाणेकरांना वेठीला धरू दिले जाणार नाही असा इशारा भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नारायण पवार यांनी दिला आहे.
दरवाढ प्रस्तावित करताना ४० टक्के पाणी गळतीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याबद्दल नारायण पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेचा अर्थसंकल्प हा ३ हजार ७८० कोटींपर्यंत पोहचला आहे. त्यामध्ये ६५ कोटी रूपये ही नगण्य रक्कम आहे. गेल्या काही वर्षात महापालिकेनं तांत्रिक सल्लागारावर कोट्यावधी रूपये खर्च केले पण त्यातील अनेक प्रकल्पांची वीटही रचली गेली नाही. अशा परिस्थितीत ६५ कोटी रूपयांच्या उत्पन्नासाठी ठाणेकरांना वेठीस धरू दिले जाणार नाही असा इशारा नारायण पवार यांनी दिला आहे.