खेळाच्या मैदानातील १५ टक्के भागात बाळासाहेब ठाकरे कलादालन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला २५ कोटींचा निधी मंजूर
ठाणे :
भाईंदर पूर्वेच्या खेळाचे मैदान आणि सामाजिक वनीकरणाच्या आरक्षणापैकी खेळाच्या मैदानातील १५ टक्के भागात बाळासाहेब ठाकरे कलादालन बांधण्याची मागणी शिवसेनेने सतत चालवली होती. अखेर आरक्षण क्र.१२२ मधील बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक भवन आणि कलादालनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २५ कोटींचा निधी मंजूर केला असल्याची माहिती शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. तसे आदेश मुख्य सचिवांना दिल्याचे सांगून यामुळे कलादालनाचे काम लवकर सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
महासभेच्या मंजुरीनंतर २०१८ मध्ये राज्य शासनानेही मैदानाच्या १५ टक्के क्षेत्र इतके बांधकाम करण्यास बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक भवनला मान्यता दिली होती. त्याची निविदा प्रक्रिया झाली. खासदार राजन विचारे यांनी २५ लाखांचा खासदार निधी, तर सरनाईकांनी २५ लाखांचा आमदार निधी दिला. स्थानिक शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी प्रत्येकी साडेबारा लाखांप्रमाणे ५० लाखांचा निधी देण्याची तयारी दर्शवली होती.
तत्कालीन भाजपा आमदार नरेंद्र मेहता व सत्ताधारी भाजपने स्थायी समितीमध्ये बाळासाहेबांच्या सांस्कृतिक भवनच्या कामाची निविदा सातत्याने नामंजूर केली. गेल्या वर्षी संतप्त शिवसेना नगरसेवक-पदाधिकारी यांनी स्थायी समिती सभागृहासह महापौर, आयुक्त दालनात तोडफोड केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन समिती सभागृहात ठाणे जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली असता, आ. सरनाईक यांनी नियोजित कलादालनाला सरकारकडून २५ कोटींचा निधी देण्याचा मुद्दा मांडला होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मागणीला पाठिंबा दिला. त्यावेळी २५ कोटींचा निधी देण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना राज्याच्या मुख्य सचिवांना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे उपस्थित होते.