साथरोग प्रतिबंध कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सर्व जिल्हा यंत्रणेची —पालकमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे
: राज्य शासनाचे कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविणे यास सर्वोच्च प्राधान्य असून साथरोग प्रतिबंध कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सर्व जिल्हा यंत्रणेची असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करा असे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
कोरोनासंदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक पालकमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर,पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर , पोलीस आयुक्त नवी मुंबई संजय कुमार , पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड, सर्व महानगरपालिका आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक कैलास पवार, सर्व नगरपालिका मुख्याधिकारी, तसेच इतर प्रशासकीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री शिंदे म्हणाले, या आपतकालीन परिस्थितीमध्ये प्रशासनातील सर्वच घटकांनी मार्गदर्शक सूचनांनुसार आपापली जबाबदारी पार पाडावी. यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. नागरिकांच्या आरोग्याला महत्व द्यावे. नागरिकांमध्ये भीती आहे. जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले त्यांच्यासाठी मानसिक आधार देण्याची आवश्यकता असून क्वॉरंटाईन केलेल्या ठिकाणी त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. परिस्थितीजन्य निर्णय घेण्याचे सर्वाधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. प्रत्येक यंत्रणांनी वेळीच त्यांच्याकडून आलेल्या आदेशानुसार कार्यवाही करून प्रशासनाला अवगत करावे.
कोरोना विषाणू परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी मिशनमोडमध्ये काम करणे गरजेचे आहे. सर्वच संशयितांची माहिती घेवून त्याबाबतचे निर्णय घेण्यात यावेत, तसेच या काळात वैद्यकीय विभागांना प्रशासकीय सहकार्य करावे, यामध्ये वैद्यकीय अधिका-यांची भूमिका महत्त्वाची आहे. प्रत्येकाला जी जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यानुसार त्यांनी वेळेवर आपली जबाबदारी पार पाडावी अशा सुचना त्यांनी दिल्या.
आवश्यक तेथे मागणीनुसार रुग्णवाहिका सेवा सुसज्ज ठेवण्यात याव्यात, वैद्यकीय साधनसामग्रीच्या मागणी व साठ्याबाबत आढावा घेण्यात यावा, वैद्यकीय विभागांना आवश्यक तेथे पोलीस विभागाने सहकार्य करावे. मास्क, सॅनिटायझर यांचा काळाबाजार होणार नाही, अशी दक्षता घ्यावी. सार्वजनिक स्वच्छतागृह या ठिकाणी सॅनिटायजर, साबण आणि पाणी उपलब्ध राहील यांची दक्षता घ्यावी. प्रत्येकाने स्वच्छता बाळगावी. महानगरपालिका, पंचायत समितीच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवावे. आवश्यक तेथे धुरळणी, फवारणी करावी. रिक्षा व टॕक्सी चालकांना मास्क व सॅनिटायजर जिल्हा प्रशासानाने उपलब्ध करून द्यावे असेही पालकमंत्री शिंदे यांनी सांगितले.
या कालावधीमध्ये लग्नसमारंभ व इतर समारंभाबाबत समुपदेशन करण्यात यावे. रहिवासी सोसायट्यांमध्ये नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांनी काय करावे अथवा काय करु नये, याबाबत प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. या जनजागृती मोहिमे मध्ये राजकीय पक्ष, सार्वजनिक संस्था, सार्वजनिक मंडळे, रोटरी क्लब, सामाजिक कार्यकर्ते यांचा सहभाग घेण्यात यावा असेही त्यांनी यावेळी सूचित केले.
कोरोनाचा प्रार्दुभाव पसरु नये याकरिता राज्यातील सर्व धार्मिक उत्सव रद्द करावेत. सर्व धर्मिय प्रार्थनास्थळांमध्ये दैनंदिन पूजाअर्चा व धार्मिक विधी शिवाय भाविकांसाठी तेथे प्रवेशास काही दिवस प्रतिबंध करावा. व्यापक जनहित लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी कायद्याचा वापर प्रभावीपणे कराव असेही श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
कोरोना' चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उद्योजकांनी औद्योगिक घटकांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शक्य असल्यास 'वर्क फ्रॉम होम' ची मुभा द्यावी, असे आवाहन श्री शिंदे यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. तसेच प्रशासकीय विभागांकडून कोणत्या प्रकारची काळजी घेण्यात यावी हे स्पष्ट केले. नागरिकांनी आपल्या परिसरातील स्वच्छतेबाबत सतर्क रहावे तसेच याकाळात संवेदनशीलता महत्त्वाची असल्याचे सांगितले.