शहरातल्या छुप्या वृक्षतोडीवर महापौरांचे मौन
ठाणे
ठाण्यात राबवण्यात येणाऱया मोठ मोठ्या प्रकल्पांकरिता प्रचंड प्रमाणात वृक्षतोड करण्यात येत आहे. ही वृक्षतोडीकडे ठाणे महानगर पालिका जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. वेगवेगळ्या प्रकल्पावर काम करणारे ठेकेदार बेमालुमपणे ही वृक्षतोड करीत आहेत. तरी अशा प्रकारची छुपी वृक्षतोड शहरात कोठेही सुरू नाही, असा दावा महापालिका प्रशासन करत आहे. मात्र ठाण्यातील तीन हात नाका पासून ते घोडबंदर रोड परिसरातील सुमारे पाच हजाराहून अधिक वृक्षतोड छुप्या पद्धतीने करण्यात आली आहे. याकडे महापालिका प्रशासन यासंबंधीच्या तक्रारींकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमीं नागरिक करत आहेत.
ठाणे शहरात विकासाच्या नावाखाली होत असलेल्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणप्रेमींमध्ये कमालीची नाराजी आहे. वृक्ष प्राधिकरण समितीने गेल्या काही वर्षांत बिल्डरांचे प्रकल्प तसेच रस्तारुंदीकरण आणि मेट्रो प्रकल्पासाठी हजारोंच्या संख्येने वृक्ष कत्तलीस परवानगी दिली आहे. शहरातील वनसंपदेचे संवर्धन व्हावे आणि विकासाच्या नावाखाली एकेक झाड तोडताना सखोल अभ्यास व्हावा यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली होती. मात्र शहरातील भरमसाट वृक्षतोड लक्षात घेता उच्च न्यायालयाने ही समिती बरखास्त करण्याचे आदेश दिले होते. परंतु यावर कोणतीही हालचाल झालेली नाही. विद्यमान महापौर याबाबत चुप्पी साधून असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.