नवी मुंबईतील विविध प्रश्नासंदर्भात विधानभवनात बैठक संपन्न
नवी मुंबई,
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील मुख्यमंत्री समिती कक्षात ठाणे जिल्हा आढावा बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत नवी मुंबईतील विविध प्रश्न, नागरिकांच्या समस्या व अनेक प्रलंबित मागण्या बेलापूर विधानसभेच्या आ. मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केल्या. मुख्यमंत्री ठाकरे यांनी नवी मुंबईच्या प्रलंबित मागण्या, विविध समस्या व प्रश्न यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन आमदार म्हात्रे यांना दिले.
त्याचबरोबर नवी मुंबईतील विस्तारित गावठाणातील प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांच्या घरांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार असून, नवी मुंबईतील सिडको अखत्यारीतील घरांचा फ्री होल्ड शासन निर्णय लवकरच निघणार आहे. वाशी येथील एपीएमसी संकुल आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याबरोबरच नवी मुंबईतील पोलिसांच्या घरांची पुनर्बांधणी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच मरिना प्रकल्पाचे टेंडर लवकरच निघणार असून, पंतप्रधान आवास योजनेतून झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविणार असल्याचेहीं सांगण्यात आले.