धुळवडीत मद्यप्राशन करत गाडी चालवणाऱ्या तळीरामांवर वाहतूक पोलिसांची कारवाई
ठाणे
यंदाच्या होळी आणि धुळवडीवर करोना विषाणूचे सावट होते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा सर्वत्र धुळवडीचे जोरदार सेलिब्रेशन दिसले नसले तरी ठाणे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सोमवारी रात्रीपासूनच मद्यपी वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात झाली होती. मद्यप्राशन करून गाडी चालवणे कायद्याने गुन्हा असूनही अनेकांनी या नियमाला हरताळ फासल्याचे दिसून आले. धुळवडीच्या उत्साहात मद्यप्राशन करत गाडी चालवणाऱ्या तळीरामांवर मंगळवारी वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला होता. ठाणे पोलिस आयुक्तालयात सायंकाळी ६ वाजेपर्यंत १२४ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. मात्र, यंदा करोना विषाणूच्या संसर्ग भीतीमुळे मद्यतपासणीसाठी ब्रेथ अॅनालायझर मशिनचा वापर केला नव्हता. वासावरून वाहनचालकांना चाचणीसाठी थेट रुग्णालयात पाठवण्यात येत होते, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे कारवाईमध्ये घट झाल्याचे दिसून येते.
मद्यतपासणीसाठी वाहतूक पोलिस विशेष करून ब्रेथ अॅनालायझर मशिनचा वापर करतात. मद्यप्राशन केल्याचे आढळल्यास त्या वाहनचालकांवर कारवाई होते. त्यामुळे कारवाईची आकडाही दरवर्षी मोठा असतो. मागील वर्षी वाहतूक पोलिसांनी ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत ९४० मद्यपींवर कारवाई केली होती. यंदा मात्र करोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी मशिनचा वापर करण्यात आला नाही. त्यामुळे कारवाईचा आकडा खूपच कमी झाला आहे. एखाद्या चालकाने दारू पिल्याचा वास आल्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात येत होते. तेथे मद्यचाचणी केली जात होती. मंगळवार सायंकाळी सहा वाजेपर्यंत पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत १२४ तळीरामचालकांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये ठाणे विभागात ६६, भिवंडी ३०, कल्याण १४ आणि उल्हासनगर १४ मद्यपी चालकांवर कारवाई केली आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. करोना विषाणूच्या संसर्ग भीतीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुढील आदेश येईपर्यंत ब्रेथ अॅनालायझर मशिनचा वापर करण्यात येणार नसल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपआयुक्त अमित काळे यांनी दिली.