वाशी बाजारसमिती खुली झाल्याने नागरिकांना दिलासा
ठाणे
करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या संचार बंदी सुरू आहे. मात्र तरीही भाजीविक्री करणाऱ्या दुकानांत तसेच भाजीमंडईमध्ये ग्राहकांची गर्दी होत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सर्वच चौकांमध्ये किरकोळ विक्रेत्यांमार्फत भाजीपाला आणि फळे रास्त दरात उपलब्ध करून द्यावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना दिल्या आहेत.
मात्र करोनाच्या भीतीमुळे पुणे, नाशिक या जिल्ह्यंतून भाज्यांची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी भाजीपाला मुंबईत आणण्यास नकार दिल्यामुळे बाजारात भाज्यांची आवक ९० टक्कय़ांनी घटली होती. त्यामुळे किरकोळ बाजारात भाज्यांच्या किमतीत १० ते ८० रुपयांनी वाढ झाली होती. त्यातच गर्दी टाळण्याच्या उद्देशाने वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
परंतु, भाजीपाला ही जीवनावश्यक वस्तू असून त्याचा पुरवठा जास्तीत जास्त प्रमाणात होण गरजेचे आहे, यासाठी मंगळवारी भाजी व्यापारी संघटनेची बैठक झाली. या बैठकीत भाजीपाल्यांची आवक नेहमीप्रमाणे करण्यात येईल. तसेच वाशी कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू ठेवण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला. या निर्णयावरुन गुरुवारी वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांच्या २२ गाडय़ा दाखल झाल्या होत्या. मात्र, गुरुवारी राज्य सरकारने भाजीपाल्याचा पुरवठा योग्य प्रमाणात करावा, असे आदेश दिल्यानंतर शुक्रवारी सकाळी नाशिक आणि पुण्याहून सुमारे ५१३ भाज्यांच्या गाडय़ा वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झाल्याची माहिती वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी दिली.