कोपरखैरणे येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे मेळाव्याचे आयोजन

नवी मुंबईतील काळे धंदे नाईकांच्या आशीर्वादाने सुरू आहेत- आव्हाडांचा आरोप



नवी मुंबई :


महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई शहरातील वातावरण राजकीय धुळवडीने चांगलेच तापले आहे.आमदार गणेश नाईक यांना कोरोना व्हायरसचे बॅण्ड ऍम्बेसेडर करा, अशी खरमरीत टीका राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नाईकांवर केली. नवी मुंबईतील काळे धंदे नाईकांच्या आशीर्वादाने सुरू आहेत. शहरातील सर्वात मोठा खंडणीबहाद्दर कोण असेल तर तो गणेश नाईक आहे, असा खळबळजनक आरोप आव्हाड यांनी केला.


कोपरखैरणे येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आयोजित मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून जितेंद्र आव्हाड यांना बोलावण्यात आले होते. त्या वेळी आव्हाड यांनी बोलताना नाईकांचा समाचार घेतला. "पक्षाचे अध्यक्ष शरद पवार अनेक वेळा दौऱ्यावर असताना दिवसाला किमान पाच हजार लोकांना भेटत असतील, कधी कोणाशी हात मिळवत असतील; तर कोणाच्या खांद्यावर हात ठेवत असतील; पण कधी हात धुतले नाहीत. मात्र नाईकांनी कधी कोणाशी हात मिळवला की लगेच डेटॉलच्या बाटलीने हात धुतला पाहिजेत. लोकांबद्दल घृणा असलेला असा माणूस मी कधीच पाहिलेला नाही', अशा शब्दात आव्हाड यांनी नाईकांवर टीका केली.अनधिकृत बांधकामांवरून आव्हाडांनी नाईकांवर टीकास्त्र सोडले. लोकांच्या बिल्डिंगांना नाईकांनी नेहमी अनधिकृत म्हणून हिणवले. पण स्वतः दगडखाणींजवळ अनधिकृत बांधकामे केली.व्हाईट हाऊस, ग्लास हाऊस हे काय आहे?  विरोधी पक्षनेते विजय चौगुले, मंदा म्हात्रे, एम. के. मढवी हे गणेश नाईकांमुळेच पक्ष सोडून गेले, असा आरोप आव्हाड यांनी केला.


नाईकांचे आव्हाडांना प्रत्युतर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आमदार गणेश नाईकांवर केलेल्या आरोपांना नाईकांनी चोख प्रत्युत्तर दिले. ऐरोलीत महिला दिनानिमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात बोलताना 'ये तेरे बस की बात नही, तेरे बाप को बोल, नाम पूछा तो बोलो, गणेश नाईक', अशा शब्दात नाईकांनी प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचे डायलॉग मारून आव्हाड यांना उत्तर दिले. कोणी मुंबई, कोणी ठाणे; तर कुणी पुणे आणि कुणी साताऱ्यावरून या शहराचा कारभार चालवू शकतील का? आणि करू शकत असाल तर पहिले तुमच्या शहरातील विकास करा ना. मग आमच्या शहरात या अक्कल शिकवायला. असे बोलून नाईकांनी मविआच्या नेत्यांना आव्हान दिले. "हाथी चलता है अपनी चाल... बाकी काय समजायचे आहे ते समजा', अशा फिल्मी स्टाईलने नाईकांनी विरोधकांना उत्तर दिले. नाईकांवर जर खंडणीबहाद्दराचे आरोप असतील तर मग तक्रार करा, हा गणेश नाईक तुमच्या समोर उभा आहे मोठ्या ताकदीने, असे बोलून विरोधकांना आव्हान दिले.