गडकरी रंगायतनसह सर्व मॉलमधील सिनेमागृह देखील बंद

करोनाची दहशत


गडकरी रंगायतनसह सर्व मॉलमधील सिनेमागृह देखील बंद



ठाणे 


कोरोनाचा फैलावाला आळा बसण्याकरिता आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी राज्य शासनाने ठाणे, मुंबईतील सिनेमागृहे, जिम, जलतरणतलाव बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ठाण्यातील गडकरी रंगायतनसह  शहरातील मॉलमध्ये असलेले तसेच छोटे सिनेमागृह बंद झाल्याचे दिसून आले. त्यातही शनिवार आणि रविवार हे सुटीचे दिवस असल्याने ठाण्यातील दोन मोठ्या मॉलमध्ये गर्दी होत होती. परंतु, या शनिवारी मात्र या मॉलमध्ये शुकशुकाट असल्याचे दिसून आले.


कॅडबरी, नितीन कंपनी व घोडबंदर येथील मॉलचालकांनी करोना बाबत खबरदारी घेतल्याचे दिसले. कॅडबरीजवळील मॉलच्या प्रवेशद्वारावरच सॅनिटायझरची सुविधा उपलब्ध करून दिली होती. तसेच मॉलमधील प्रत्येक सुरक्षारक्षकांना मास्क बंधनकारक केले होते. तसेच वेळोवेळी फरशीची सफाईदेखील केली जात होती. स्वच्छतागृहांमध्येही साफसफाई आणि हॅण्डवॉश ठेवल्याचे दिसत होते.


जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून मॉलधारकांनी आपल्या सुरक्षारक्षकांना मास्क देऊन स्वच्छतेबाबतही चोख पावले उचलल्याचे दिसून आले.  मेडिकलमध्येच सॅनिटायझरचा तुटवडा असल्याने मॉलमधील दुकानांच्या प्रवेशद्वारावर ते दिसले नाही. मध्यरात्रीपासून सिनेमागृहे बंद करण्याचे आदेश आल्यानंतर त्यानुसार त्या आदेशाचे पालन करून शहरातील सर्वच मॉलमधील सिनेमागृहांच्या बाहेर बंदचे फलक लावले आहेत.


शहरातील छोटी सिनेमागृहेही बंद ठेवली होती. मॉलधारकांनी स्वच्छता तसेच नागरिकांच्या बाबतीत योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले होते. 


सध्या जे कोरोनाचे सावट संपूर्ण जगावर घोंगावत आहे, त्यातून सावरण्यासाठी आम्हीदेखील यात सहभागी असून त्याविरोधात लढा देण्यासाठी सज्ज असल्याचे मॉलधारकांनी सांगितले. त्यामुळे नफातोट्याचा विचार न करता या आजारावर मात कशी करता येईल, याचाच सध्या आम्ही विचार करत असल्याचेही स्पष्ट केले.