नवी मुंबई : अवैधरित्या गावठी बनावटीच्या बंदुका तयार करून त्यांची विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने अटक केली आहे. परशुराम राघव पिरकड (४०) आणि दत्ताराम गोविंद पंडित (५५) अशी या दोघांची नावे असून त्यांच्याकडून गावठी बनावटीच्या बारा बोअरच्या १० बंदुका, २ काडतुसे, ८ अर्धवट बंदुका व बंदुका बनविण्यासाठी लागणारे साहित्य तसेच, मोबाइल फोन व एक दुचाकी जफ्त केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त प्रवीणकुमार पाटील यांनी दिली. पनवेलमधील जुन्या मुंबई-पुणे महामार्गलगतदानफाटा येथे दोन व्यक्ती देशी बनावटीच्या बंदुकांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेतील पोलिस हवालदार सतीश सरफरे यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एन. बी. कोल्हटकर व त्यांच्या पथकाने सापळा लावून पिरकड आणि पंडित या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी युट्यूबवरील व्हिडीओ पाहून गावातील शेतामध्ये बंदुका तयार केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून बंदूक बनविण्यासाठी लागणारे स्टिलचे पाइप, लाकडी बट, ड्रिल मशिन, ग्राइंडर मशिन, वेल्डिंग मशिन, लोखंडी पट्टा आदी साहित्य जफ्त केले. त्यानंतर या दोघांविरोधात पनवेल तालुका पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिस उपायुक्त प्रवीणकुमार पाटील यांनी सांगितले. न्यायालयाने या आरोपींना २४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावलीआहे. तीन वर्षांपूर्वी त्यांनी युट्यूबवर बंदुका बनविण्याचे व्हिडीओ पाहून १२ बोअरच्या बंदूका तयार करण्यास सुरुवात केली. त्यांनी बंदुका बनविण्यासाठी लागणारे साहित्य कुर्ला, कर्जत, खोपोली भागातून घेतल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या दोघांनी अशाप्रकारे बंदूका तयार करून त्या कर्जत व पनवेल भागात विकल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार, या दोघांनी बंदुकाची विक्री कुणाला केली? त्या बंदुकांचा गुह्यात वापर झाला का? त्याबाबत अधिक तपास सुरू आहे.
गावठी बंदुका बनवून विकाणाऱ्यांना अटक