मृत व्यक्तीची संपत्ती नावावर करण्यासाठी उद्धव ठाकरेंचा ग्रामपंचायतीवर दबाव; सोमय्यांचा आरोप

 

रायगड: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृत व्यक्तीची संपत्ती स्वत:च्या नावे करण्यासाठी ग्रामपंचायतीवर दबाव आणला होता. ही मृत व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून अन्वय नाईक आहेत, असा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या जमीन खरेदीचे सर्व व्यवहार कोर्टात उघड करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. किरीट सोमय्या यांनी आज रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात जाऊन ग्रामपंचायतीला भेट दिली. त्यानंतर त्यांनी हा आरोप केला. मृत अन्वय नाईक यांच्या मालकीच्या 19 मालमत्ता 5 कोटी 29 लाख किंमतीच्या मालमत्ता ग्रामपंचायतीने ठाकरे कुटुंबाच्या नावे कशा प्रकारे केल्या हे पाहून मान शरमेने खाली जाते. 2014मध्ये अन्वय नाईक यांच्याकडून ठाकरे परिवाने करार केला होता. नाईक यांच्या मृत्यूनंतर ठाकरे परिवाराने ही जमीन स्वत:च्या नावे करून घेतली. हे सर्व व्यवहार आम्ही कोर्टात उघड करू, असं सोमय्या यांनी सांगितलं.