मुंबईः कोरोनाचे संकट संपत नाही तोपर्यंतच राज्यावर बर्ड फ्लूचा मोठा धोका निर्माण झालाय. राज्यात मोठ्या प्रमाणात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावातील 800 कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनही खडबडून जागे झालेय. विशेष म्हणजे त्या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच (Birds Flu ) झाल्याचं निदान करण्यात आल्यानं एकच खळबळ उडालीय. आता राज्यातील अनेक भागांतून अज्ञात रोगानं कोंबड्या दगावण्याचे प्रकार समोर येत आहेत. देशांतल्या मध्य प्रदेश, हरियाणा, केरळमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग पसरला होता. आता हे बर्ड फ्लूचं संकट महाराष्ट्रातही येऊन धडकलंय. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पक्षी मृतावस्थेत आढळून येत आहेत. या पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्लू (Bird Flu) या आजाराने झाल्याचं निष्पन्न होत आहे.
बीडमधल्या पाटोद्यात चार दिवसांत तब्बल 26 कावळ्यांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील मुगाव येथे चार दिवसांत तब्बल 26 कावळ्यांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती. मृत कावळ्यांचा अहवाल पुण्याला पाठविण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट आज आलाय. कावळ्यांमध्ये बर्ड फ्ल्यू या संसर्गाचे विषाणू आढळून आल्याने प्रशासन सतर्क झाले.
लातुरातील केंद्रेवाडीत अज्ञात रोगानं कोंबड्या दगावण्याचं सत्र सुरूच
लातूर जिल्ह्यातल्या केंद्रेवाडी इथं अज्ञात रोगाने कोंबड्या दगावण्याचं सत्र सुरूच आहे, शनिवारी 350 कोंबड्या दगावल्या होत्या, तर रविवारी 40 कोंबड्या दगावल्या आणि आज पुन्हा 40 कोंबड्या अज्ञात आजाराने दगावल्यात. विशेष म्हणजे ज्या पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या दगावत आहेत, ते गावरान कोंबड्यांचं फार्म आहे. निमोनिया यांसारख्या आजाराने या कोंबड्या दगावत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे . पुणे येथील प्रयोग शाळेत मृत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र त्याचा रिपोर्ट अद्यापही आलेला नाही . जिल्हा प्रशासनाचे अधिकारी या घटनेवर लक्ष ठेवून आहेत .
परभणीतील मुरंबा येथे ‘बर्ड फ्लू’मुळे 800 कोंबड्यांचा मृत्यू
परभणी जिल्ह्यातील मुरुंबा येथे ‘बर्ड फ्लू’मुळे 800 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचा अहवाल भोपाळच्या प्रयोगशाळेकडून प्राप्त झालाय, त्यानंतर सेलू तालुक्यातील कुपटा गावातील मृत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेत. मुरुंबापाठोपाठ कुपटा गावाचा 10 किमी परिसरही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलाय. कुपटा परिसरात पोल्ट्री नसली तरी जोडधंदा म्हणून शेतकरी कुक्कुटपालन करतात. त्या ठिकाणच्या कोंबड्या दगावल्याने जिल्ह्यात अन्य ठिकाणी ‘बर्ड फ्लू’ची लागण होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्यात. जिथे बर्ड फ्लू आढळून आलाय, त्या ठिकाणासह आसपासच्या एक किलोमीटरच्या परिसरातील कोंबड्या नष्ट करण्यात येणार आहेत. तसेच या परिसरात नागरिकांना जाण्यास मज्जाव करण्यात आलाय.
रत्नागिरीत आठवड्याच्या आत कावळे मृत्युमुखी पडण्याच्या घटना
रत्नागिरीत जिल्ह्यातील दापोली शहरामध्ये डंपिंग ग्राऊड इथं पाच कावळे मृत झाल्यानंतर आणखी दोन कावळे मृत्युमुखी पडले आहेत. दापोली शहरातील बुरोंडी नाका इथे ही घटना घडलीय. पहिल्या मृत झालेल्या कावळ्यांचा पुण्यातून अहवाल येण्याआधीच दुसरी घटना घडलीय. मृत पक्ष्यांना हात न लावण्याचे पशुसंवर्धन विभागाचे आदेश आहेत. बर्ड फ्लूच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे सतर्कतेचा आदेश दिलाय.
नांदेडमधील हिमायतनगरमध्ये 100 कोंबड्यांचा मृत्यू
नांदेडमधील हिमायतनगर तालुक्यातील चिंचोर्डी गावात शंभर कोंबड्यांचा मृत्यू झालाय, तर हिमायतनगर शहरात मृतावस्थेत आढळल्या शेकडो मधमाश्या, चिंचोर्डी गावात तीन पोल्ट्री व्यावसायिकांच्या शंभर कोंबड्या दगावल्यात, कोंबड्यांना दफन करून पशुसंवर्धन विभागाला दिलीय सूचना.
उस्मानाबाद जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग सतर्क
मराठवाड्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यानंतर उस्मानाबाद जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला असून, कोंबडी उत्पादकांनी वेळेवर लसीकरण, कोंबड्यांच्या खुराड्यात स्वच्छता व स्वच्छ पाणीसह काळजी घेण्याचे आवाहन केले आहे, उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या तरी एकही कोंबडीचा रोगाने मृत्यू झालेला नाही.