“वा! ही तर टाटा, बिर्लांची सेना!!”, आशिष शेलारांचा ‘ताज हॉटेल’ प्रकरणावरुन शिवसेनेवर निशाणा

 

मुंबई: भाजप नेते आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेच्या ( BMC) कारभारावरुन शिवसेनेवर (Shivsena) निशाणा साधला आहे. “टाटांच्या हॉटेल ताजला 9 कोटींची सूट द्यायला निघालेल्या मुंबई महापालिकेने “बीएसई” वर मात्र कारवाईचा बडगा उगारलाय”, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. मुंबई महापालिकेच्या ताज हॉटेलला सूट देण्याच्या निर्णयावरुन आशिष शेलार यांनी शिवसेनेला ही तर “वा! ही तर टाटा, बिर्लांची सेना!!”, अशी टीका केली आहे. 
आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावर टीका करताना पुन्हा एकदा महापौरांवर निशाणा साधलाय. “महापालिकेची कंत्राटे मुलाला आणि जावयाला तर करात सवलती टाटा आणि बिर्लांना???” असा सवाल शेलार यांनी ट्विटद्वारे उपस्थित केला आहे. आशिष शेलार यांनीही यापूर्वी एक व्हिडीओ शेअर करत महापालिकेच्या कारभारावर निशाणा साधला होता. त्यावेळी महापौरांच्या मुलाला वरळीच्या कोविड सेंटरमध्ये काम आणि जावयाला सॅनिटायझर पुरवण्याचं काम देण्यात आले, त्यांना किती मिळाले? सँनिटायझर पुरवणाऱ्या बोगस कंपन्यांच्या घशात किती घातले? महापालिका वरळीला विशेष निधी देते, त्यामुळं वरळीला वेगळा न्याय का आणि इतर भागाला वेगळा न्याय का?  महापौरांच्या मुलाला आणि जावयाला वेगळा न्याय आणि मुंबईकरांना वेगळा न्याय का?,असही आशिष शेलार म्हणाले होते. 1600 कोटींचा हिशोब द्या 400 कोटी हवेत कशाला?

मुंबई महापालिका कोरोनावर 6 महिन्यात 1600 कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगतेय. पालिकाअजून 400 कोटी हवेत असे म्हणतेय. पण, झालेल्या खर्चाचा हिशोब का देत नाही?, असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे. मुंबई महापालिकेच्या 1600 कोटीच्या मंजुरीनंतर 400 कोटींचा प्रस्ताव आल्यानं भाजपनं हिशोब देण्याची मागणी केली, असं आशिष शेलार म्हणाले. मुंबई महापालिकेने 1600 कोटींचा हिशोब पारदर्शकपणे द्यावा, अशी मागणी आशिष शेलारांनी केली. मुंबईचा एक एक माणसाचा जीव वाचला पाहिजे ही सत्य परिस्थिती आहे. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाच्या वेळी झालेल्या खर्चाचा हिशोब मुंबई पालिका का देत नाही, असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला.

लपवा छपवी का करताय?

आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर कोरोना काळातील खर्चावरुन टीकास्त्र सोडलं आहे. 1600 कोटी रुपयांचा हिशोब देण्याऐवजी महापालिकेकडून लपवा छपवी का करण्यात येतेय, असंही ते म्हणाले. मुंबई महापालिका 1600 कोटींच्या हिशोबाची लपवाछपवी का करतेय, असंही ते म्हणाले. पालिकेने कोणतीही लपवाछपवी न करता 1600 कोटी रुपयांचा हिशोब द्यावा अशी मागणी, आशिष शेलार यांनी केली आहे.