मुंबई: राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून काँग्रेसकडे दुर्लक्ष केलं जात असून शिवसेना आणि राष्ट्रवादी राज्यातील काँग्रेसचं वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न करत सुरू आहे, अशी तक्रार मुंबई काँग्रेसचे महासचिव विश्वबंधू राय यांनी थेट काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे. विश्वबंधू राय हे काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांचे निकटवर्तीय असल्याचं मानलं जातं.
विश्वबंधू राय यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून सात मुद्द्यांवर हायकमांडचं लक्ष वेधलं आहे. त्यात शिवसेना-राष्ट्रवादीकडून काँग्रेसचं होत असलेल्या खच्चीकरणावरही भर दिला आहे. राय यांच्या या पत्रामुळे आघाडीत सर्व काही अलबेल नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला दुय्यम स्थान मिळत असल्याचा रोखच या पत्राचा असल्याने काँग्रेस नेत्यांच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्हं निर्माण होत असल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. दरम्यान, या पत्रावरून काँग्रेसमधून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.