पालघर जिल्ह्यातील विक्रमगड, जव्हार, मोखाडा तालुक्यात पिन बोरर या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मोगरा शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.

 

पालघर : कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गामुळे संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था थांबली. यामुळे सर्वच क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. अशात आता मोगरा उत्पादक शेतकरीही मोठ्या संकटात सापडला आहे. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड, जव्हार, मोखाडा तालुक्यात पिन बोरर या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मोगरा शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. या रोगामुळे उत्पादन घटल्याने दादर, नाशिक, कल्याण बाजारात मोगऱ्याच्या कळ्यांच्या मागणीत वाढ होताच भावही चांगलेच वाढले आहेत.मोगऱ्याच्या कळ्यांचा भाव 1200 ते 1500 रुपयांनी वाढला आहे. एकीकडे भाव वाढल्याने शेतकऱ्यांसाठी ही चांगली बातमी आहे. पण पिकांवरील रोगामुळे मात्र बळीराजा हवालदील झाला आहे. पालघर जिल्ह्यात आदिवासी मोठ्या प्रमाणात मोगऱ्याचे उत्पादन घेतात कोरोनामुळे सुरुवातीचा हंगाम वाया गेला. दादर आणि नाशिक मार्केटमध्ये या चालू हंगामात मोगरा कळ्यांचे उत्पादन घेण्याच्या तयारीत असताना अचानक आलेल्या थंडीच्या लाटेमुळे व पिन बोरर या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मोगरा शेतकऱ्यांची कंबरच मोडली आहे.

यामुळे कुटुंब कसं चालवावे या विवंचनेत शेतकरी चिंतागस्त आहे. इतकंच नाही तर तातडीने या रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आण्यासाठी कृषी प्रयोगशाळेत या रोगावर परीक्षण करून तात्काळ उपाय सुचवावे अशी मागणी शेतकरी करत आहेत.