11वी प्रवेशाबाबत लवकरच निर्णय, तर राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरु करण्याचा विचार - वर्षा गायकवाड

राज्य सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून टप्प्याटप्प्यानं शाळा सुरु करण्याचा विचार करत आहे. राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरु करण्याचा विचार असल्याचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. तर 11वी प्रवेशाबाबत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत विद्यार्थीहिताचा निर्णय होणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.



मुंबई: राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरु करण्याच्या प्रक्रियेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच बैठक घेणार आहे. त्या बैठकीत विद्यार्थीहिताचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. राज्य सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून टप्प्याटप्प्यानं शाळा सुरु करण्याचा विचार करत आहे. 9वी ते 12वीचे विद्यार्थी हे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त सजग असल्याने आणि त्यांचे महत्वाचे शैक्षणिक वर्ष असल्याने त्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरु करण्याबाबत विचार केला जाईल, असं गायकवाड यांनी सांगितले आहे. 


11 प्रवेशाबाबत लवकरच निर्णय


तर मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याने 11वी प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालये सुरु होण्यास वेळ लागत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठक घेणार आहेत. या बैठकीत विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यात येईल, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.