ठाणे महापौर चषक कुस्ती स्पर्धेत यापुढे प्रथम क्रमांक विजेत्या महिला स्पर्धेकालाही देणार चांदीची गदा

 

ठाणे, ता. 9 : ठाणे महापौर चषक कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या महिला स्पर्धकांनाही यापुढे चांदीची गदा देण्यात येणार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनेची अंमलबजावणी प्रशासनाने केली असून सन 2019-20 या कालावधीत घेण्यात आलेल्या ठाणे महापौर चषक कुस्ती स्पर्धेतील महिला खुल्या गटात प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या कोल्हापूरच्या सृष्टी जयवंत भोसले हिला महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते नुकतीच चांदीची गदा, शाल व श्रीफळ देवून सन्मानित करण्यात आले.

यापूर्वी ठाणे महापौर चषक कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या पुरुष स्पर्धकांना चांदीची गदा देण्यात येत होती. पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांनी महिला विजेत्यांनाही चांदीची गदा देण्याची सूचना केली होती. त्यानुसार यापुढे आता कुस्ती स्पर्धेतील महिला विजेत्यांनाही चांदीची गदा देण्यात येणार आहे.

ठाणे महापौर चषक कुस्ती स्पर्धा सन 2019-20 या जानेवारी महिन्यात पार पडल्या. या स्पर्धेत महिला खुल्या गटात कोलहापुरच्या सृष्‌टी जयवंत भोसले वय 19 वर्षे हिने महिला खुल्या गटात प्रथम क्रमांक पटकाविला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनेनुसार चांदीची गदा तिला आज महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी महापौरांनी तिला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला, अतिरिक्त आयुक्त 1 गणेश देशमुख, उपायुक्त संदीप माळवी, कार्मिक अधिकारी महादेव जगताप, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे, ठाणे जिल्हा कुस्ती असोसिएशनचे रमाकांत पाटील व रंगराव पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या अद्वैता मांगले-बांदेकर आदी उपस्थित होते.