नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज १२ वा दिवस आहे. पंजाब, हरियाणा सह देशभरातून हजारो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. केंद्रानं मंजूर केलेले तिनही कृषी कायदे रद्द करावे अशी या आंदोलक शेतकऱ्यांची मागणी आहे. या आंदोलनात तरुण, वृद्द, महिला, मुली आणि लहान मुलंही सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. गेल्या 12 दिवसांपासून सुरु असलेलं हे आंदोलन कसं पुढे जात आहे? आंदोलकांच्या जेवणाची सोय काय? दिल्लीसारख्या ठिकाणी कडाक्याच्या थंडीत हे आंदोलन कसे तग धरुन आहेत? असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतील. तर या आंदोलनाची काही खास वैशिष्ट्येच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
आंदोलनात पुस्तकालय!
12 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी गाजीपूर प्लायओव्हरवर रविवारी एक वेगळच चित्र पाहायला मिळालं. इथं अस्थायी स्वरुपात एक पुस्तकालय सुरु करण्यात आलं आहे. रविवारी आंदोलक शेतकऱ्यांनी या पुस्तकालयावर मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली. आंदोलकांमधीलच काही युवकांनी हे पुस्तकालय सुरु केलं आहे. यामध्ये सामाजिक प्रश्नांसह क्रांतीकारकांच्या आयुष्यावर आधारित पुस्तकं पाहायला मिळाली. महात्मा गांधी, शहीद भगत सिंह आणि करतार सिंह सराभा यांची पुस्तकं मोठ्या प्रमाणात दिसून आली. त्यासोबतच अर्जेंटीनेचे मार्क्सवादी क्रांतिकारक चे ग्वेरा आणि रशियाचे लेखक मॅक्सिस गोर्की यांचीही अनुवादित पुस्तकं इथं विक्रीसाठी आहेत.