कल्याण : केडीएमसीच्या रखडलेल्या आठ बड्या प्रकल्पांची पाहणी भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी केली. यावेळी त्यांनी महापालिकेच्या ढिसाळ कामकाजाची पोलखोलही केली आहे. हे सर्व प्रकल्प रखडण्यास केवळ प्रशासनच जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, यावेळी सत्ताधारी शिवसेनेचं नाव घेणे त्यांनी टाळलं आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात अनेक प्रकल्पांची कामं सुरु आहेत. महापालिका निवडणूक जवळ आली आहे. महापालिकेत भाजप हा विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. डोंबिवलीचे भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी आज डोंबिवलीतील रखडलेल्या आणि सुरु असेलल्या प्रकल्पांची पाहणी केली. त्यामध्ये डोंबिवलीतील सुतिका गृह, कोपर रेल्वे उड्डाणपूल, महापालिकेचे विभागीय कार्यालय, पंपिंग सेंटर, मच्छी मार्केट, क्रॉक्रीटीकरण रस्ता, वाहनतळ, ठाकूली रेल्वे स्थानकाच्या दिशेने सुरु असलेल्या एलिवेटेड पूल आणि मोठा ठाकूर्ली माणकोली खाडी पूल या प्रकल्पांची पाहणी केली आहे.
या दरम्यान, त्यांनी प्रत्येक प्रकल्पात किती निधी खर्च झाला आहे. कशा प्रकारे त्यासाठी भाजपने पाठपुरावा केला आहे आणि हे प्रकल्प कशामुळे रखडले याचा पाढाच वाचला. या पाहणी दौरा दरम्यान भाजपाचे गटनेते शैलेश धात्रक, माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेते राहुल दामले, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे सहभागी होते. याबाबत आमदार चव्हाण यांनी सांगितले की, हे सर्व प्रकल्प फक्त प्रशासनाच्या दिरंगाईमुळे रखडलेले आहेत.
सात दिवसांच्या आत या प्रकल्पांना गती देता येऊ शकते. मात्र, प्रशासनाची विकासाची मानसिकताच नाही. प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी हा पाहणी दौरा होता. लवकरच हे प्रकल्प मार्गी लागावेत अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.
या पाहणी दौऱ्यादरम्यान महापालिकेतील सत्ताधारी पक्ष शिवसेनेचे एकदाही नाव घेतले नाही. गेल्या 25 वर्षातील अडीच वर्षे वगळता सर्व काळ सत्ता शिवसेना-भाजपची होती. मात्र, राज्यात शिवसेना भाजपची युती तुटल्यापासून महापालिकेत भाजपविरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे.