नव्या संसद भवनाच्या बांधकामाला जवळपास 862 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यामुळेच विरोधकांनी कोरोनाच्या काळात हा अनावश्यक खर्च केल्याचा आरोप करत मोदी सरकारवर जोरदार टीकाही केली आहे. हे बांधकाम सध्याच्या संसद भवनाच्या परिसरातच होणार आहे. 2022 पर्यंत हे काम पूर्ण होण्याचं ध्येय ठेवण्यात आलं आहे. 2022 मध्येच भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे स्वातंत्र्याचा हा उत्सव नव्या संसद भवनातच साजरा करण्याचा मोदी सरकारचा उद्देश आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदेची ही नवी इमारतीचा विस्तार जवळपास 65,000 चौरसमीटर इतका असेल. याशिवाय या इमारतीचं 16921 चौरसमीटर बांधकाम जमिनीखालीही होणार आहे (Tata Group Will Construct The New Parliament).
संसदेची नवी इमारतही 3 मजली असणार आहे. यात एक ग्राऊंड फ्लोअर आणि त्यावर 2 मजले अशी रचना असेल. ही इमारत त्रिकोणी आकारात असेल. आकाशातून पाहिल्यास ही इमारत 3 रंगांमधील किरणांप्रमाणे दिसेल. संसदेतील लोकसभा इमारतीत 888 आसन व्यवस्था करण्यात येणार आहे. भविष्यात वाढत्या सदस्य संख्येचा विचार करुन ही संख्या वाढवण्यात आली आहे. संयुक्त अधिवेशनात 1224 सदस्यांची बसण्याची व्यवस्था असेल. नव्या इमारतीतही एका बाकावर दोन खासदार अशीच बैठक व्यवस्था असेल. या बाकाची लांबी 120 सेंटीमीटर असेल. राज्यसभेच्या नव्या इमारतीत 384 आसनांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
नव्या संसद भवनात एक संविधान हॉल असेल. त्यात भारताच्या लोकशाहीचा वारसा असलेल्या गोष्टींचं खुल प्रदर्शन असेल. या शिवाय खासदारांना ग्रंथालय, वेगवेगळ्या समित्यांसाठी वेगवेगळ्या खोल्या, खाण्याची प्रशस्त सुविधा आणि वाहनांच्या पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. या भवनात सर्वोच्च स्ट्रक्चरल सुरक्षा स्टॅण्डर्ड्सचं पालन केलं जाईल. यामध्ये भूकंप क्षेत्रातील 5 आवश्यकतांचे पालन करणेही सामील असले.