वसईच्या समुद्रात बुडालेली स्विफ्ट अखेर जेसीबीच्या मदतीने बाहेर

 

वसई : भुईगाव समुद्र किनाऱ्यावर पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून आलेली गाडी अखेर 24 तासानंतर बाहेर काढण्यात आली. जेसीबीच्या साहाय्याने स्विफ्ट कारला बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं. कळंबच्या समुद्र किनाऱ्यावरुन, वसईच्या भुईगाव समुद्र किनाऱ्यापर्यंत गाडी भरतीच्या पाण्यात वाहत आली होती.

बुधवारी सकाळी गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना ही कार पाण्यात बुडालेल्या अवस्थेत आढळून आली होती. ही कार कुणाची आहे, याचा शोध सुरु आहे. याबाबत वसई पोलीस ठाण्यात नोंद करून पोलीस याचा शोध घेत आहेत.

समुद्र किनाऱ्यापासून 500 मीटरवर खोल समुद्रात कार अडकली होती. कार पूर्णपणे समुद्रात बुडालेल्या अवस्थेत होती. फक्त तिचा वरचा टप आणि काच दिसत होती. कार समुद्रातील रेतीमध्ये फसल्याने तिला बाहेर काढणे कठीण जात होते.

पोलीस, वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान यांनी सकाळपासून शर्थीचे प्रयत्न केले. अखेर संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास जेसीबीच्या साहाय्याने कार बाहेर काढण्यात यश आलं. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास बंदी, पण पर्यटकांकडून नियमांचे उल्लंघन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी आहे. वसई विरार महापालिकेनेही नवीन वर्षाच्या स्वागताची नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. समुद्रावर जाण्यास पर्यटकांना बंदी आहे. पण नियमांना बगल देत हौशी पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर जात असल्याचे उघड झाले आहे.

दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी पर्यटक ही कार समुद्राच्या किनाऱ्यावर लावून मौजमजा करत असावेत. रात्री साडेदहाला समुद्रात भरती होती. या भरतीत ही कार समुद्रात वाहून गेल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.