महाराष्ट्रातही शेतकरी आंदोलनाचा वणवा पेटला; चांद्यापासून बांद्यापर्यंत शेतकऱ्यांचा आसूड कडाडला!

पालघर: केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीत गेल्या आठ दिवसांपासून सुरू केलेल्या आंदोलनाचा वणवा आता महाराष्ट्रातही पेटला आहे. महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या शेतकऱ्यांनी आंदोलन करत कृषी कायद्याला विरोध करतानाच पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे. राज्यात आज ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले. घोषणाबाजी करत या आंदोलकांनी केंद्रीय मंत्र्यांच्या पुतळ्यांना जोडे मारो आंदोलन केलं. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांनी जेलभरो आंदोलन केल्याने तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. सोलापुरात माकप नेते नरसय्या आडम यांना ताब्यात घेण्यात आल्याने वातावरण अधिकच तापलं आहे.