ठाणे : अन्य देशांमध्ये आलेली कोरोनाची दुसरी लाट लक्षात घेता कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार येत्या 16 जानेवारी 2021 पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे, असा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. नुकतंच जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी संबंधित यंत्रणांना याबाबतचे निर्देश दिले आहेत.
ठाणे जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळा विद्यार्थ्यांसाठी 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. सध्या ठाणे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार नियंत्रणात आहे. मात्र अन्य देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे इतर राज्यांतील कोरोनाची स्थिती पाहता, सर्व जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा 16 जानेवारी 2021 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि मनपा आयुक्तांशी विचारविनिमय करुन हा निर्णय घेतला आहे.
ऑफलाईन शाळा बंद ठेवण्यात येणार असल्या, तरी ऑनलाईन शैक्षणिक अभ्यासक्रम तसेच शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशांचे पालन करणे संबंधित शाळा प्रशासनावर बंधनकारक असेल असेही जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.