मुंबई: आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्यानंतर आता जोरदार राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. मेट्रोचं काम थांबवण्यासाठीच भाजपकडून कटकारस्थान सुरु असल्याचा गंभीर आरोप अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. सर्व बाबी तपासून राज्य सरकार केंद्राला उत्तर देईल, अशी माहितीही मलिकांनी दिली आहे.
आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. पण कांजूरमार्गची नियोजित जागा ही केंद्राच्या मालकीची असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. मेट्रो कारशेडसाठी राज्यानं प्रस्तावित केलेली कांजूरमार्गची जागा ही मिठागाराची असल्याचं पत्र केंद्र सरकारनं राज्याच्या मुख्य सचिवांना लिहिलं आहे. त्यावर नवाब मलिक यांनी केंद्रावर चांगलीच आगपाखड केली आहे.
‘केंद्र सरकारने 2002 मध्ये मिठागाच्या अनेक जागा राज्य सरकारकडे हस्तांतरित केल्या आहेत. ही खासगी जमीन असल्याचा दावा यापूर्वी भाजपनेच केला होता आणि आता केंद्र सरकार त्यावर आपला दावा सांगत आहे. भाजपला मेट्रोच्या कामात अडथळा आणायचा असल्यानंच हे कटकारस्थान सुरु आहे, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे. केंद्राचा हा दावा तपासून राज्य सरकार केंद्राला योग्य उत्तर देईल, असंही मलिक यांनी सांगितलं.