'लव्ह जिहाद' हा भाजपचा अजेंडा, मुलगा-मुलीची पसंती महत्त्वाची: किशोरी पेडणेकर


मुंबई: लव्ह जिहाद हा केवळ भाजपचा अजेंडा आहे. भाजप यावरुन केवळ शब्दांचा खेळ करत आहे, अशी टीका मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी केली. लव्ह जिहाद (Love Jihad) कुठे झालाय हे आम्ही दाखवून देऊ. पण लग्न हा मुलगा-मुलीच्या पसंतीचा विषय आहे. मात्र, भाजप यावरून केवळ राजकारण करू पाहत आहे, असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. 


किशोरी पेडणेकर यांनी शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रार्थनास्थळे उघडल्यामुळे कोरोना वाढला, या आपल्या वक्तव्याचा भाजपकडून विपर्यास करण्यात आल्याचे सांगितले. मी केवळ प्रार्थनास्थळे म्हटले नाही तर बारमध्ये जाण्यानेही कोरोना वाढला. लोक कोरोनाबाबत गंभीर नाहीत. मुंबईत दोन टक्के लोकांनी यावरुन राजकारण करण्याचा घाट घातल्याची टीका किशोरी पेडणेकर यांनी केली.


तसेच उद्धव ठाकरे यांच्या संयमी नेतृत्त्वामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याचा दावा पेडणेकर यांनी केला. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 15 दिवसांसाठी लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द कराव्यात, अशी मागणीही किशोरी पेडणेकर यांनी केली.


तत्पूर्वी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी लव्ह जिहादवरून भाजपकडून सुरु असलेल्या राजकारणावर टीका केली होती. कोणी कोणाशी लग्न करायचे, हा वैयक्तिक अधिकारी आहे. आपला देश हा धर्माच्याआधारे नव्हे तर संविधानानुसार चालतो, असे अस्लम शेख यांनी म्हटले.


अस्लम शेख यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आक्षेप घेतला. अस्लम शेख यांनी याकूब मेननच्या फाशीला विरोध केला होता. थोड्या दिवसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही त्यांचीच भाषा बोलू लागतील. मात्र, आम्ही महाराष्ट्रात लव जिहाद होऊ देणार नाही. युपी सरकारने लव्ह जिहादवर कायदा आणण्याची संपूर्ण तयारी केली आहे, त्यांचं आम्ही समर्थन करतो. यूपीसारखा कायदा महाराष्ट्रात लागू करावा यासाठी आम्ही विधानसभेत प्रस्ताव मांडू, असं किरीट सोमय्या यांनी म्हटले. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’वरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.


Popular posts
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image