जळगाव : खडसेच्या कारचे टायर फुटून जळगावमध्ये हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात खडसे सुखरुप असून गाडीतील कोणालाही दुखापत झालेली नाही.
अमळनेर येथील कार्यक्रम आटोपून जळगावकडे येत असताना एकनाथ खडसे यांच्या गाडीला अपघात झाला. खडसेंच्या गाडीचे टायर फुटले, मात्र चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडीवर नियंत्रण मिळवले. खडसेंसह गाडीतील सर्व जण सुखरुप असून कोणालाही इजा झालेली नाही.
याआधी, एकनाथ खडसे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत एकाच गाडीने नंदुरबार दौरा पूर्ण केला. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे अनिल देशमुख यांच्या हस्ते श्री नारायण मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळेस गृहमंत्र्यांसोबत एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
गेली 40 वर्षे भाजपला वाढवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेऊन भाजपचा चेहरामोहरा बदलण्यात महत्त्वाचं योगदान देणारे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी 23 ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांनी पत्नी मंदाकिनी, कन्या रोहिणी आणि शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचं घड्याळ हातावर बांधलं.
एकनाथ खडसे यांनी 21 ऑक्टोबरला भाजपचा राजीनामा दिला होता. “काही मिळालं, नाही मिळालं याचं दु:ख नाही, देवेंद्र फडणवीसांनी छळले. मी फक्त फडणवीसांवर नाराज आहे” असं एकनाथ खडसे म्हणाले होते.
राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांना राज्यपालांच्या कोट्यातून आमदारकी दिली जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. “मी कोणत्याही पदाच्या अपेक्षेने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला नसून मी आमदारकी किंवा खासदारकी मागितली नाही. पण ती दिली तर आनंदच आहे” असं खडसे म्हणाले. पद मिळालं तरी काम करणार आणि नाही मिळाले तर कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.