अहमदनगर : सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील कृषी विद्यापीठामधील अधिकारी कर्मचार्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन 3 नोव्हेंबर पासून सुरू आहे. आंदोलक आता आक्रमक झाले असून रविवारपासून महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीसह सगळ्या कृषी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. राहुरी कृषी विद्यापीठाच्या मुख्य कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. राहुरी येथे उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आंदोलकांची भेट घेतली.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आज राज्य सरकारचा निषेध केला. सरकारने मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी त्यांनी केलीय. 2018 पासून वारंवार मागणी करूनही सातवा वेतन आयोग न मिळाल्यानं राज्यातील सर्वच कृषी विद्यापीठात आंदोलन सुरू करण्यात आले आहे. हे आंदोलन विविध स्तरावर करण्यात येत आहे. सुरुवातीला निषेध मोर्चा व नंतर सामूहिक रजा आंदोलन करण्यात आलं. मात्र, सरकारने कुठलाही सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने आता काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलं आहे.
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आंदोल न स्थळी जात आंदोलकांची भेट घेतली. मात्र, आंदोलक आणि सरकारमध्ये झालेल्या चर्चेत कुठलाही तोडगा निघाला नाही. मात्र, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत हा मुद्दा मांडणार असल्याचं प्राजक्त तनपुरे यांनी सांगितलं आहे.
आंदोलनाचा शेतकऱ्यांना फटका
दरम्यान, कृषी विद्यापीठातील काम बंद आंदोलनामुळे शेतक-यांची फरफट होत आहे. रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी बी – बियाणे मिळत नसल्याने शेतक-यांनी संताप व्यक्त केलाय. गेल्या अनेक दिवसापासून हे आंदोलन सुरु असून भविष्यात असेच आंदोलन सुरू राहील तर शेतकरी ही अडचणीत येण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामाच्या तोंडावर सुरू असलेल्या या आंदोलनामुळे बी-बियाणांची वाढती मागणी आहे. त्यामुळे सरकार नेमकं काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं आहे.
एकीकडे कोरोनाच संकट , दुसरीकडे बळीराजा संकटात अशा परिस्थितीत आता बळीराजाला मदत करणाऱ्या कृषी विद्यापीठामध्ये सुद्धा आंदोलन करण्यात येत असून सरकार दिवाळी पूर्वी घोषणा करून दिलासा देणार का हे पाहावे लागणार आहे.