मुंबई : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नुकतंच त्यांनी याबाबतचे ट्विट केलं आहे.
तीव्र पोटदुखीमुळे मागील काही दिवसांपासून मी त्रस्त आहे. त्यामुळे उपचारासाठी आज मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे. प्रकृती स्थिर असून उपचार घेऊन मी लवकरच पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईल, असे ट्वीट मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.
धनंजय मुंडेंना कोरोना
दरम्यान धनंजय मुंडे यांना जून महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर अकरा दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांची पुन्हा चाचणी करण्यात आली. ही चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ते 14 दिवस होम क्वारंटाईन होते.
रुग्णालयातून बाहेर पडताना धनंजय मुंडे यांनी हात उंचावून आणि हात जोडत डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले होते. धनंजय मुंडे यांच्यासोबत कोरोनाची लागण झालेले त्यांचे खाजगी सचिव, एक स्वीय सहाय्यक, दोन वाहन चालक, एक अंगरक्षक यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. या सर्वांची दुसरी चाचणीही निगेटिव्ह आली होती.
दरम्यान धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच त्यांच्या कुटुंबियांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. सुदैवाने अहवाल निगेटिव्ह आला होता. धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण झाल्यानंतर बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार हेदेखील काही दिवस होम क्वारंटाईन झाले होते.
धनंजय मुंडे हे बीडमधील परळीचे आमदार आहेत. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते आमदारपदी निवडून आले. ठाकरे सरकारमध्ये त्यांच्या खांद्यावर सामाजिक न्याय मंत्रिपदाची धुरा देण्यात आली. त्यांनी आपल्या समर्थकांना उपास-तापास, नवस न करण्याचे आवाहन केले होते.