शेतकऱ्यांसाठी उर्जामंत्र्यांची मोठी घोषणा


नागपूर: नैसर्गिक संकटांमुळे खरीप हंगामात प्रचंड नुकसान सहन करावे लागलेल्या शेतकऱ्यांना आता राज्य सरकारकडून लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामासाठी राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसाही वीज देण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरु आहे.


राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी गुरुवारी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना यासंदर्भातील माहिती दिली. आम्ही राज्यात रब्बी हंगामात शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज देण्याचा विचार करत आहोत. याबाबतचा निर्णय अंतिम झाल्यास सिंचनासाठी अखंडित वीज देण्याच्या सूचना मुख्य अभियंत्यांना देण्यात येतील. कोरोनाच्या संकटानंतर राज्यातील वीजेची मागणी वाढली असली तरी पुरेसा वीजपुरवठा होईल, अशी ग्वाही उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली.


तसेच राज्यातील वीज कर्मचाऱ्यांच्या संपाबाबतही नितीन राऊत यांनी भाष्य केले. वीज कर्मचारी सध्या माझ्याशी चर्चा करत आहेत. हा तिढा लवकरच सुटेल. वीज कर्मचारी संपावर जाणार नाहीत. कोणाचीही दिवाळी अंधारात जाणार नाही, असेही नितीन राऊत यांनी सांगितले.


शेतकऱ्यांसाठी खुशखबर; दोन दिवसांत नुकसान भरपाईचे पैसे खात्यात जमा होणार


निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतर अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा राज्य सरकारचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानुसार आता येत्या शनिवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार आहे.


जून ते ऑक्टोबरदरम्यान नुकसान झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारकडून 294 कोटी 81 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील जवळपास पाच लाख पूरग्रस्त शेतकऱ्यांची खातेनिहाय यादी तयार करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यात शनिवारपर्यंत पैसे जमा होतील.