वसई-विरार-नालासोपारा, ठाणे, मुंबईतील वाहन चोरणारी टोळी गजाआड


वसई : वसई-विरार-नालासोपारासह ठाणे, मुंबई परिसरात मोटारसायकल, चार-चाकी वाहन चोरणाऱ्या टोळीचा विरारमध्ये भांडाफोड करण्यात अर्नाळा पोलिसांना यश आले आहे. या टोळीतील 3 जणांना अटक करुन त्यांच्याकडून 13 लाख 70 हजार रुपये किमतीच्या सहा चारचाकी आणि चार मोटारसायकल वाहनं जप्त करण्यात आली आहेत.


या चोरट्यांनी अर्नाळा, वसई, तुलिंज, कासारवडवली, वर्तकनगर, पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केलेल्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. अटक केलेले तिघेही आरोपी हे वसईतील राहणारे आहेत.




अर्नाळा पोलिसांच्या ताब्यात असणारे हे तीन जण सराईत वाहन चोरी करणारे चोरटे आहेत. ब्रयुनो लिप्सन मच्याडो (वय 27), रुपेश वॉलेरियन डिमेलो (वय 35), अमन उर्फ अरमान आरिफ शेख (वय 20) असे या चोरट्यांची नाव असून हे तिघेही वसई विरार नालासोपारा परिसरातील राहणारे आहेत. यातील ब्रयुनो मच्याडो हा यातील मास्टर माईंड आहे. वसई-विरार-नालासोपारा परिसरात घरफोडी, वाहनचोरीच्या घटना वाढल्या होत्या.


यावरुन मीरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्त सदानंद दाते यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात अंतर्गत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक निर्माण केले आहेत. अर्नाळा सागरी पोलीस ठाणे हद्दीत वाढत्या गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमला ब्रयुनो मच्याडो हा अशा प्रकारचे गुन्हे करत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती.


यावरुन मच्याडोला पोलिसांनी ताब्यात घेवून त्याची चौकशी केली असता त्याने आणखी दोघांनाची नाव सांगितली. यातील रुपेश आणि अमन हे दोन आरोपी विरार पोलिसांच्या आगोदरच ताब्यात होती.


अर्नाळा पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी वसई, तुलिंज, विरार, अर्नाळा, कासारवडवली, वर्तकनगर या पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. या तीन जणांकडून 13 लाख 70 हजार रुपये किमतीची 4 मोटारसायकल, 7 चार चाकी वाहन जप्त करण्यात अर्नाळा पोलिसांना यश आले आहे. आणखीन गुन्हे यांच्याकडून उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहेत.