ठाणे दि. 6 - ठाणे महापालिकेच्या कारभारातील अनियमितता घडवून घडविलेले भ्रष्टाचार उघड होवू नयेत आणि कोरोनाच्या काळात झालेले भ्रष्टाचार कोरोना संसर्गच्या नावाखाली लपविता यावेत यासाठी स्थायी समिती सभा अद्यापही पूर्वीप्रमाणे सभागृहात घेतली जात नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालक मंत्री, महापौर, स्थायी समिती सभापती यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांची शपथ घेवून सांगावे की, ठाणे महापालिकेच्या कारभारातील अनियमितता घडून भ्रष्टाचार झालेला नाही का? असा घणाघाती सवाल भाजप नगरसेवक कृष्णा पाटील यांनी सत्ताधाऱयांना विचारला आहे.
त्यांनी या संदर्भात प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना पत्र लिहून आगामी स्थायी समिती सभा सभागृहात घेण्याची मागणी केली आहे. वारंवार मागणी करून देखील पालिका सभा घेण्यास अनुकूल नसल्याचे वास्तव उघड झाल्याने कृष्णा पाटील यांनी या संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहेत. कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे ठाणे महापालिकेच्या आतापर्यंतच्या सर्व सभा, बैठका, मीटिंग वेबिनारवर घेण्यात आलेल्या आहेत. आता विधानसभा अधिवेशन, संसदेचे अधिवेशन आणि शासनाचे विविध कार्यक्रम पण सभागृहात होत आहेत. तसेच बाजारपेठा, कार्यालये, मॉल, स्वीमिंग पूल, व्यायामशाळा देखील लोकांसाठी पूर्ण क्षमतेने खुले केलेल्या आहेत, शिवाय सिनेमागृह खुली करण्याची परवानगी देखील दिलेली आहे. बेस्ट बसेस आणि एसटीच्या बसेस पूर्ण प्रवाशी क्षमतेने वाहतूक करतात, रेल्वे लोकलमध्ये पण पूर्वीप्रमाणेच गर्दी असते. मग प्रवाशांना, नागरिकांना, आमदार, खासदार यांना कोरोना संसर्ग होत नाही. पण ठाणे महापालिकेची विविध प्रशस्त सभागृहे असतानाही महापालिकेच्या विविध सभा आणि मीटिंग आयोजित करताना कोरोना लागण नगरसेवक आणि महापालिका अधिकारी यांना कशी होवू शकते? असा सवाल कृष्णा पाटील यांनी केला आहे.