मंदिरे उघडताच चोरट्यांचा हैदोस, CCTV वर पोते टाकून दानपेटी फोडली


चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात मंदिर उघडताच चोरी ल्ह्यातील धाबा येथील प्रसिध्द कोंडय्या महाराज मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली आहे. यावेळी मंदिरातील सीसीटीव्हीवर पोते पांघरुन कनेक्शनही कापण्यात आलं. त्यामुळे चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अडथळा येत आहे.


राज्यातील मंदिरं उघडल्यावर लगेच चोरट्यांनी मंदिरांवर डाव साधल्याचं चित्र आहे. महाराष्ट्र-तेलंगणातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेले श्री संत परमहंस कोंडय्या महाराज देवस्थानातील दानपेटी चोरट्यांनी फोडली आहे. हे मोठे मान्यतेचे मंदिर चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील धाबा या गावात आहे. आजपासून कोंडय्या महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याला सुरुवात होत आहे.


देशभरात मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गामुळे मंदिर धार्मिक स्थळ बंद आहेत. केवळ नैमित्तिक पूजा आणि सणांच्या निमित्ताने होणाऱ्या महापूजेसाठी मंदिरं उघडली जात होती. कालच राज्य सरकारने नियमांचे पालन करुन मंदिरं उघडण्याची परवानगी दिली. त्याचा राज्यभर जल्लोषही झाला.


मात्र, आज सकाळी परमहंस संत कोंड्या महाराज पुण्यतिथी सोहळ्याला सुरुवात होणार असल्याच्या निमित्ताने ट्रस्टी आणि भाविकांनी मंदिरात प्रवेश करताच त्यांना मंदिराची दानपेटी फोडलेली आढळून आली. हे करताना चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरावर पोते पांघरले आणि केबल कनेक्शन देखील तोडले.


पहाटेला पुजाअर्चा करण्यासाठी भक्त मंदिरात गेले असता चोरीची घटना उघडकीस आली. या घटनेने धाबा गावात एकच खळबळ उडाली आहे. संस्थानने चोरी झाल्याची तक्कार धाबा पोलीस स्टेशनला नोंदवली आहे. पोलीस याप्रकरणाचा तपास करत असून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.