दादरच्या शिवाजी पार्क चौपाटीवर व्ह्यूईंग गॅलरीची उभारणी, समुद्रासह सेल्फीचा आनंद लुटता येणार


मुंबई : दादरच्या शिवाजी पार्क येथे समुद्राला लागूनच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असलेली चैत्यभूमी आहे. या चैत्यभूमीला लागूनच समुद्रात बांधकाम करून व्ह्यूईंग गॅलरी उभारण्यात येणार आहे. त्यामुळे याठिकाणी भेट देणाऱ्या लाखो लोकांना समुद्र किनारा, सी-लिंकसोबत सेल्फी काढता येणार आहे.


दादर चौपाटी आणि चैत्यभूमीला लाखो लोक भेट देत असतात. या लाखो लोकांना व्ह्यूईंग गॅलरीमुळे दादर चैत्यभूमी, चौपटी, वरळी सीलिंक समुद्र किनाऱ्यावरून सहज पाहता येणार आहे.


या व्ह्यूईंग गॅलरीचे बांधकाम हे सीआरझेड 1 च्या अंतर्गत येते. त्यामुळे पालिका प्रशासनाला या बांधकामसाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. या गॅलरीचे काम करताना पायलिंग आणि आरसीसीचे काम असणार आहे. या गॅलरीच्या तीन बाजूला लोखंडी जाळ्या लावण्यात येणार आहे.


तसेच गॅलरीवरुन कोणीही घसरून पडू नयेत यासाठी पेव्हर ब्लॉक लावले जाणार आहेत. विशेष म्हणजे या गॅलरीचा सर्व वयातील लोकांना सहज वापर करता यावा याप्रमाणे त्याची रचना केली जाणार आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.


दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क येथे समुद्रकिनाऱ्यावर व्ह्यूईंग गॅलरी (Viewing Gallery) उभारण्यात येणार आहे. यामुळे आता शिवाजी पार्क येथे फिरायला येणाऱ्या पर्यटकांना समुद्र किनारा, वांद्रे-वरळी सीलिंकसोबत सेल्फीचा आनंद लुटता येणार आहे. सर्व वयोगटातील व्यक्तींना या गॅलरीचा वापर करता यावा, यानुसार याचे बांधकाम केले जाणार आहे.