अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.


सोलापूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला १० वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बार्शी सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे तब्बल दोन वर्षांनी पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळाला आहे.


जिल्ह्यातील माढा तालुक्यात 2018 मध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणातील आरोपी गोपाळ उर्फ भैय्या दुर्योधन पाटील याला बार्शी जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवून बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.


दोन वर्षांपूर्वी 25 मार्च 2018 रोजी ही घटना माढा तालुक्यात घडली होती. पीडित अल्पवयीन मुलीला त्रास झाल्याने तिच्या आईने तिला विचारणा केली. तेव्हा तिने भैय्या दुर्योधन पाटीलने केलेले कृत्य आईला सांगितलं. त्यानंतर पीडितेच्या आईने कुर्डूवाडी पोलीस स्टेशनमध्ये भैय्या दुर्योधन पाटील विरोधात गुन्हा दाखल केला होता.


गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी गोपाळ उर्फ भैय्या दुर्योधन पाटीलला अटक करण्यात केली. कुर्डूवाडी पोलिसांनी यासंदर्भात तपास करुन बार्शी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. न्यायालयाने या प्रकरणावर निर्णय देत भैय्या दुर्योधन पाटीलला दोषी ठरवून बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात दहा साक्षीदारांची तपासणी करण्यात आली होती.