मुंबई : राज्यात कोरोना आणि लॉकडाऊन काळात वाढीव वीजबिलाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेकांना लॉकडाऊन काळात अव्वाच्या सव्वा बील आल्याने ती भरायची कशी असा प्रश्न सर्वसामान्यांपुढे पडला आहे. या पार्श्वभूमीवर वीज ग्राहकांना मदत करण्यासाठी तसेच वीज बिल भरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी बेस्टने ग्राहकांना बिलात दोन टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना आणि लॉकडाऊन दरम्यान वीज ग्राहकांना लाखोंची वीजबिल आली आहेत. त्या ग्राहकांना मदत करण्यासाठी, वीजबिल भरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आणि उर्वरित थकबाकी वसुलीसाठी बेस्टने वीज ग्राहकांना बिलात दोन टक्क्यांची सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.
बेस्टने दिलेल्या माहितीनुसार, ज्या वीजग्राहकाने नोव्हेंबर महिन्याचे वीजबिल तात्काळ भरले, त्याला एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमधील वीज वापरावरील प्रदान आकार आणि वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज माफ करण्यात येईल. तर एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या वीज वापराच्या बिलात 2 टक्के सूट देण्यात येईल.
तर नोव्हेंबर महिन्यातील वीजबिल नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीमध्ये भरल्यास त्या ग्राहकाला एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमधील वीज वापरावर विलंब शुल्क आणि व्याजात सूट दिली जाईल. या ग्राहकाला एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या वीज वापराच्या बिलावर 1 टक्के सूट दिली जाईल.
या संबंधित महिन्यातील वीजबिलाचे तिन्ही हप्ते वेळेत भरले तर व्याजाबाबत सूट दिली जाईल. हा हप्ता भरल्यानंतर ग्राहक त्यावरील सूट मिळविण्यास पात्र राहील. ही सूट पुढील वीज बिलात समाविष्ट केली जाईल. शिवाय ज्यांनी वेळेत बिले भरली आहेत त्यांना 2 टक्के सूट दिली जाईल.