वैभव नाईकांच्या मतदारसंघात शिवसेनेला सुरुंग, नितेश राणेंच्या उपस्थितीत कुडाळच्या सभापती भाजपात



कुडाळ पंचायत समितीच्या सभापती नूतन आईर यांनी भाजपचा झेंडा हाती घेतल्यामुळे आता भाजपची सत्ता आली आहे.





सिंधुदुर्ग : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापासून ठाकरे आणि राणे कुटुंबात पुन्हा द्वंद्व सुरु झालं आहे. याचे पडसाद स्थानिक राजकारणातही उमटताना दिसत आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांच्या कुडाळ मालवण (Kudal) मतदारसंघातच भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सेनेला झटका दिला. कुडाळ पंचायत समितीच्या सभापती नूतन आईर यांनी भाजपात प्रवेश केला.


सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना आणि राणे कुटुंबीय यांच्यात अनेक वेळा थेट लढत पाहायला मिळाली आहे. त्यातच शिवसेनेला कुडाळमध्ये मोठा धक्का बसला आहे. कुडाळ पंचायत समितीच्या सभापती नूतन आईर यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे कुडाळ पंचायत समितीत आता भाजपची सत्ता आली आहे.




वैभव नाईक हे सिंधुदुर्गातील कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार आहेत. त्यांच्या मतदारसंघातच नितेश राणेंनी शिवसेनेला धक्का दिला. वैभव नाईक यांच्या मतदारसंघातच सेनेला सुरुंग लागल्याची चर्चा स्थानिक राजकारणात रंगली आहे.


नूतन आईर यांच्यासह रांगणा तुळसुली गावाचे सरपंच नागेश आईर आणि असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजप आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवलीतील ‘ओम गणेश’ बंगल्यावर हा पक्षप्रवेश झाला. नितेश राणे यांनी कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांचे भारतीय जनता पक्षात स्वागत केले.


शिवसेनेचे दोन्ही आमदार बिनकामाचे : नितेश राणे


सिंधुदुर्गातील शिवसेनेचे दोन्ही आमदार बिनकामाचे असल्यामुळे लोकांनाही हे कळू लागलं आहे. त्यामुळे भाजपमध्ये कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात प्रवेश करत आहेत. या पुढील सर्व निवडणुकीत भाजपचेच आमदार, खासदार दिसतील अशी प्रतिक्रिया यावेळी नितेश राणे यांनी दिली आहे. 


यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, जि. प. माजी उपाध्यक्ष रणजित देसाई, माजी नगराध्यक्ष विनायक राणे, महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, भाजपा युवा प्रवक्ता दादा साईल, दीपक नारकर, राकेश कांदे, कणकवली तालुकाध्यक्ष संतोष कानडे, राजन चिके, सोनू सावंत, संदीप सावंत, अरविंद परब, पं. स. सदस्य संदेश नाईक, सर्वेश वर्दम, सुनील बांदेकर, पप्या तवटे यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.