पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मोठा गदारोळ झाला असून, अखिल भारतील विद्यार्थी परिषदेने पुंगी बजाव आंदोलन केलं आहे. विद्यापीठातील विविध विभागांतील परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षेत 14 हजारांपेक्षा जास्त तक्रारी विद्यापीठाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतरही विद्यापीठाचा कारभार संथ गतीनं सुरू आहे. विद्यापीठाच्या या कारभाराविरोधात एबीव्हीपीने आंदोलन केलं असून, बॅरिकेटिंग तोडून आंदोलक आत घुसले आहेत.
थोड्याच वेळात कुलगुरू आंदोलकांच्या भेटीला जाणार असल्याचीही चर्चा आहे. विशेष म्हणजे आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत उपकुलगुरु यांच्या गाडीला घेराव घातला. उपकुलगुरु एन. एस. उमराणी यांना धकाबुक्कीसुद्धा करण्यात आली आहे. जोपर्यंत कुलगुरू बाहेर येत नाहीत, तोपर्यंत आम्ही जाणार नसल्याचंही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलकांनी सांगितलं आहे. गेल्या दीड तासांपासून आंदोलन सुरू आहे. कुलगुरूच्या राजीनाम्याची मागणीसुद्धा आंदोलकांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अंतिम वर्षाच्या परीक्षेतील घोळ काही कमी होताना दिसत नाही. अंतिम वर्षाच्या परीक्षेतील अडचणींबाबत विद्यार्थ्यांकडून आतापर्यंत 13 हजारांपेक्षा अधिक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावर विद्यार्थ्यांनी नोंदवलेल्या अडचणी दूर करण्याचं काम विद्यापीठाकडून सुरू करण्यात आलं आहे. परीक्षेदरम्यान लॉगिन न होणं, प्रश्न न दिसणं, आकृत्या न दिसणं, उत्तरपत्रिका सबमिट न होणं, सर्व्हर जाणं अशा अनेक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागला होता.
अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भातील अडचणीच्या 13 हजारापेक्षा जास्त तक्रारी दाखल झाल्यानं ऑनलाईन परीक्षेचा कसा फज्जा उडाला हेच पाहायला मिळतं. दरम्यान, विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेल्या तक्रारींचं विभाजन करुन त्यावर निर्णय घेण्यात काम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून करण्यात येत आहेत. विद्यापीठाकडून अंतिम वर्षाच्या जवळपास अडीच लाख विद्यार्थांची परीक्षा घेतली जात आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीनं ही परीक्षा सुरु आहे. मात्र, ऑनलाईन परीक्षेत विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना एक गुगल फॉर्म उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या फॉर्मद्वारे विद्यार्थ्यांना आपल्या अडचणी विद्यापीठ प्रशासनाकडे नोंद करता येत आहे.
ऑफलाईन परीक्षेतही अडचण!
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षेला 12 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली होती. मात्र, पहिल्याच दिवशी ऑफलाईन परीक्षेचा खोळंबा झालेला पाहायला मिळाला होता. पुणे विद्यापीठाकडून ऑनलाईन पाठवल्या जाणाऱ्या प्रश्नपत्रिकांची प्रिंट करण्यासाठी आवश्यक असणारा ‘ओटीपी’च आला नाही. त्यामुळे पहिल्या सत्रातील ऑफलाईन परीक्षा ठप्प झालेली पाहायला मिळाली.
अन्य विद्यापीठांमध्येही घोळांची मालिका!
सावित्रीबाई फुले पुणे विद्याप्रमाणेच मुंबई विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षेदरम्यान मोठा घोळ पाहायला मिळाला होता. त्यामुळं अंतिम वर्षाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.