मुंबई : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याचा प्रयत्न झाल्यास राज्यातील ओबीसी आणि भटके विमुक्त समाज पेटून उठेल. असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी राज्य सरकारला दिला.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा कोणताही प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने पारित करु नये. जर सरकारने तसा प्रस्ताव पारित करण्याचा प्रयत्न केला किंवा त्यासंबंधी काही पावले उचलली तर ओबीसी आणि भटक्या विमुक्तांचा आक्रोश होईल, असा इशारा शेंडगे यांनी राज्य सरकारला दिला.
मराठा समाजातील काही संघटना, नेतेमंडळी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं गेलं पाहिजे, अशी मागणी करत आहेत. अशी मागणी करुन हे नेते महाराष्ट्रातलं सामाजिक सलोख्याचं वातावरण बिघडवण्याचं काम करत आहेत, असा घणाघात शेंडगे यांनी केला.
ओबीसी विरुद्ध मराठा वाद पेटवण्याचं षडयंत्र सुरू आहे. मराठा समाजाचं राजकारण होतंय, ओबीसी समाजाचं ताट खेचण्याचा प्रयत्न होतोय, त्यांना SEBCतून आरक्षण मिळू शकतं. या मुद्द्यावर आम्ही ओबीसी समाज बचाव आंदोलन करणार आहोत. 3 तारखेला सर्व तलाठी, तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करू, असा धमकीवजा इशाराच त्यांनी दिला आहे.
या सरकारने मराठा समाजाच्या मागण्या लगोलग मान्य केल्या. सगळ्या वर्गातील मुलं नोकरभरतीची वाट पाहत असताना सरकारने एका समाजासाठी नोकर भरत थांबवली. 13 टक्के जांगांसाठी 87 टक्के जागांची अडवणूक का? असा सवाल करत मराठा समाजाच्या 13 टक्के जागा बाजूला काढून इतर प्रवर्गातील मुलांची भरती करा, असं प्रकाश शेंडगे म्हणाले.
मराठा समाज सांगेल तेच होत असेल तर ओबीसी मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा खणखणीत इशाराही प्रकाश शेंडगे यांनी राज्य सरकारमधील ओबीसी मंत्र्यांना दिला.